भरधाव ट्रकच्या धडकेने मुलगा गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 08:31 PM2019-03-17T20:31:07+5:302019-03-17T20:31:19+5:30
आईसोबत बाजारात पायी जाणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाला भरधाव ट्रकने धडक देवून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी छत्रपतीनगरात घडली.
वाळूज महानगर : आईसोबत बाजारात पायी जाणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाला भरधाव ट्रकने धडक देवून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी छत्रपतीनगरात घडली. ट्रकचे चाक पायावरुन गेल्याने मुलाचा एक पाय निकामी झाला आहे. आर्यन हरिमोहन प्रसाद (५) असे जखमी मुलाचे नाव आहे.
हरिमोहन प्रसाद हे पत्नी संगमदेवी व मुलगा आर्यन (५) आणि अंशु (३) यांच्यासह साईनगरात वास्तव्यास आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संगमदेवी या मुलगा आर्यनसोबत सामान खरेदीसाठी पायी भाजीमंडईत जात होत्या. दरम्यान, वडगावकडून छत्रपतीनगर मार्गे बजाजनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव आयसर ट्रकने (एमएच-०७, सी- ५५४४) पायी जाणाºया आर्यनला पाठीमागून जोराची धडक दिली. तसेच काही अंतर फरफटत नेले. यात आर्यनचा डावा पाय गुडघ्यापासून निकामी झाला आहे. लगतच्या रहिवाशांनी आर्यनला रस्त्यावरुन बाजूला घेत नातेवाईकांना माहिती दिली. हरिमोहन प्रसाद, चुलते चंद्रमोहन प्रसाद व इतर नातेवाईकांनी आर्यनला खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, जमावाच्या मारहाणीच्या भितीने ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळाहून पसार झाला. या प्रकरणी चंद्रमोहन प्रसाद यांच्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.