चालकाने रजेसाठी भावाचा मृतदेह बसस्थानकात नेला; महामंडळाकडून अधिकाऱ्यांची झाली चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:36 PM2019-05-16T12:36:33+5:302019-05-16T12:44:37+5:30
अधिकाऱ्याने ‘तुमचे कोणीतरी रोज मरत असते’ असा टोला चालकाला दिला
औरंगाबाद : अंत्यविधीसाठी सुटी मंजूर करून घेण्यासाठी भावाचा मृतदेह रुग्णवाहिकेने थेट सिडको बसस्थानकात घेऊन येण्याची वेळ चालकावर ओढावलेल्या प्रकरणाची एसटी महामंडळाने गंभीर नोंद घेतली आहे. याप्रकरणी बसस्थानकातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली, तर सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांकडूनही चौकशी केली जात आहे.
घाटी रुग्णालयात मंगळवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाचे चालक तेजराव सोनवणे यांच्या भावाचे निधन झाले. त्यामुळे यासंदर्भात सकाळी सोनवणे यांनी आगारातील संबंधित एसटी अधिकाऱ्यांना माहिती दिली. सदर माहिती दिली, तेव्हा ‘तुमचे कोणीतरी रोज मरत असते’ असा टोला दिला. या प्रकारामुळे गावी जाण्यापूर्वी घाटी रुग्णालयातून थेट सिडको बसस्थानकात रुग्णवाहिका आणून संबंधित अधिकाऱ्यांना भावाचा मृतदेह दाखविला. भावाचा मृतदेह गावाला घेऊन जाण्यापूर्वी विश्रामगृहात ठेवलेले साहित्यही घेऊन गेले.
या घटनेने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सिडको बसस्थानकातील अधिकाऱ्यांची चौकशी केली. या चौकशीत सदर कर्मचारी बसस्थानकातील साहित्य नेण्यासाठीच आला होता, असा दावा सिडको बसस्थानकातील अधिकाऱ्यांनी केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तशीच माहिती देण्यात आली. याप्रकरणी मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनाही अहवाल दिला जाणार आहे.
कर्मचारी आल्यानंतर स्थिती कळेल
याप्रकरणी सिडको बसस्थानकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना विचारणा केली आहे. रजेच्या कारणासाठी कोणतीही अडवणूक केलेली दिसून आलेली नाही. संबंधित कर्मचारी कर्तव्यावर आल्यानंतर माहिती घेतली जाईल, असे विभाग नियंत्रक किशोर सोमवंशी यांनी सांगितले.
बदली रोखली
या घटनेनंतर सिडको बसस्थानकातील दोन अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश काढण्यात आले होते; परंतु बदली झाल्याने प्रकरणातील दोषीपणा सिद्ध होईल, ही बाब पुढे करून राजकीय दबावातून बदली रोखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.