आता राज्यात कोठूनही काढता येणार ‘लायसन्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 04:50 PM2019-12-24T16:50:16+5:302019-12-24T16:52:59+5:30
कोणत्याही आरटीओ कार्यालयात करता येणार शिकाऊ, पक्क्या परवान्यासाठी अर्ज
औरंगाबाद : मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ नुसार राज्यातील कोणत्याही आरटीओ कार्यालयात शिकाऊ आणि पक्क्या परवान्यासाठी (लायसन्स) अर्ज करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत याची अंमलबजावणी केली जात आहे. लवकरच राज्यात सर्वत्र याची अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा आहे.
नव्या कायद्यानुसार अनेक बदल करण्यात आले आहे. विशेषत: वाहन परवाना काढण्याच्या पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहे. आजवर परवाना काढण्यासाठी संबंधित आरटीओ कार्यालयाच्या परिक्षेत्रातील रहिवासी पत्त्याची गरज होती. त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते; परंतु ही अडचण आता लवकरच थांबणार आहे. काही वाहनधारक शिकाऊ परवाना एका आरटीओ कार्यालयातून काढतात आणि पक्क्या परवान्यासाठी अन्य कार्यालयांत अर्ज करतात. शिकाऊ परवाना देताना वय आणि निवासाचा पुरावा तपासण्याची जबाबदारी ही शिकाऊ परवाना देणा-या अधिका-याची आहे.
पक्का परवाना देणाºया अधिकाºयांवर ही जबाबदारी नसते. त्यामुळे कोणत्याही आरटीओ कार्यालयाने शिकाऊ परवाना दिलेल्या वाहनधारकांचे पक्क्या परवान्यासाठीचे अर्ज स्वीकारण्याचा निर्णय मुंबई (पूर्व) आरटीओ कार्यालयाने घेतला आहे. मोटार वाहन (सुधारणा) २०१९ नुसार शिकाऊ व पक्क्या परवान्यासाठी राज्यात कोणत्याही कार्यालयाकडे अर्ज करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
आदेश येताच अंमलबजावणी
अशा प्रकारची सुरुवात मुंबईत झाली आहे. मोटार वाहन (सुधारणा) अधिनियमासंदर्भात आदेश येताच आपल्याकडेही त्याची अंमलबजावणी केली जाईल; परंतु अद्याप आदेश प्राप्त झालेले नाही. परवान्यावरील पत्ता बदल आजघडीला कोणत्याही कार्यालयात करता येतो, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांनी सांगितले.
असे काढा विनाएंजट परवाना
आॅनलाईन सेवेद्वारे कोणत्याही एंजटशिवाय परवाना काढता येतो. परवान्यासाठी परिवहन/सारथी सर्व्हिस या नावाच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन अर्ज भरून अपॉइंटमेंट घेता येते. त्यासाठी आॅनलाईन शुल्कही भरता येते. त्यानंतर अपॉइंटमेंटच्या दिवशी आरटीओ कार्यालयात जाऊन छायाचित्र काढणे अणि चाचणी देऊन परवाना प्राप्त करता येतो.