गावखेड्यांत रात्री उडतोय ड्रोन; पण उडवतोय तरी कोण? प्रशासन अनभिज्ञ, ग्रामस्थ दहशतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 02:05 PM2024-09-11T14:05:29+5:302024-09-11T14:05:46+5:30

आजमितीला शेकडोंच्या संख्येने ड्रोन जिल्ह्यात वापरले जात आहेत. व्यावसायिक छायाचित्रकारांसोबतच हौशी व्यक्तीही ड्रोन बाळगून आहेत.

Drone flying in villages at night; But who is flying? Administration unaware, villagers in terror | गावखेड्यांत रात्री उडतोय ड्रोन; पण उडवतोय तरी कोण? प्रशासन अनभिज्ञ, ग्रामस्थ दहशतीत

गावखेड्यांत रात्री उडतोय ड्रोन; पण उडवतोय तरी कोण? प्रशासन अनभिज्ञ, ग्रामस्थ दहशतीत

गंगापूर ( छत्रपती संभाजीनगर) : जिल्हाभरात ग्रामीण भागात सध्या रात्रीच्या अंधारात भिरभिरणाऱ्या ड्रोनमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरांच्या अफवा असल्याने गावोगावी तरुणांनी गस्त घालायला सुरुवात केली असून रात्रीच्या वेळी नेमके कशासाठी ड्रोन वापरले जात आहेत? चोरीच्या उद्देशाने किंवा काही गैरप्रकारांसाठी तर नाही ना? या धास्तीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

आजमितीला शेकडोंच्या संख्येने ड्रोन जिल्ह्यात वापरले जात आहेत. व्यावसायिक छायाचित्रकारांसोबतच हौशी व्यक्तीही ड्रोन बाळगून आहेत. सर्वसामान्यांच्या तसेच सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचवू शकणारे ड्रोन सर्वत्र भिरभिरताना दिसतात. लग्नाचे जंगी सोहळे, जाहीर सभा-समारंभांमध्ये डोक्यावरून भिरभिरणारे ड्रोन्स विनापरवानाच असतात. त्याच्या वापरासाठी परवाना घ्यावा लागतो. याबाबत संयोजकही अनभिज्ञ असतात. ड्रोनच्या वापराचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण नसतानाही अनेकजण तो वापरतात. त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. ड्रोन उडवायचा असेल तर त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस यांच्यासह महापालिका किंवा पालिकेचा परवाना सक्तीचा आहे. तसे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांनीच काढले आहेत; पण ड्रोन म्हणजे कॅमेऱ्याचाच एक भाग असल्याच्या भावनेत पोलिसांसह सारेच परवानगी गृहीत धरतात.

ड्रोन वापरायचा, तर हे पाहा नियम
ड्रोनचा वापर थेट राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील भागात ड्रोन उडविण्यावर निर्बंध आहेत. पोलिसांची व प्रशासनाची कार्यालये, विमानतळ, महत्त्वाची रुग्णालये, प्रयोगशाळा, संरक्षणविषयक संस्था, समुद्रकिनारे, आदी ठिकाणी ड्रोन उडवता येत नाही. तो उडविण्यासाठी प्रशिक्षित व प्रमाणपत्रधारक कर्मचारी आवश्यक आहेत. असे प्रशिक्षण फक्त पुणे आणि दिल्लीत उपलब्ध असल्याने ते टाळण्याकडे कल आहे. ड्रोनचे वजन, त्यामुळे होणारे अपघात, रहिवासी इमारतींवर उडविण्यासाठी आवश्यक उंची यांविषयी अनेक नियम पाळावे लागतात.

ग्रामस्थांनी घाबरू नये - पोलीस अधीक्षक
पैठण, वैजापूरनंतर आता गंगापूर तालुक्यात रात्रीच्या अंधारात भिरभिरणाऱ्या ड्रोनची मोठी चर्चा सुरू आहे. हे ड्रोन नेमके कोण उडवतेय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याविषयी पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी घाबरण्याची गरज नाही. या प्रकरणी पोलिस सखोल चौकशी करीत असून, विनापरवानगी रात्रीच्या वेळी ड्रोन उडवणाऱ्या संबंधितांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Drone flying in villages at night; But who is flying? Administration unaware, villagers in terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.