निसर्गनिर्मित पाणलोट व्यवस्था मानवाने थांबविल्यामुळे दुष्काळ : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:00 AM2018-03-05T00:00:58+5:302018-03-05T00:01:09+5:30
गंगापूर/ लासूर स्टेशन : निसर्गनिर्मित पाणलोट व्यवस्था मानवाने थांबविल्यामुळेच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
गंगापूर/ लासूर स्टेशन : निसर्गनिर्मित पाणलोट व्यवस्था मानवाने थांबविल्यामुळेच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख शेतकºयांना कर्जमाफी झाली आहे. अजूनही काम सुरूच आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. शेतकºयांना जलसंधारणाच्या कामातून सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे हा अंतिम उपाय आहे. जेणेकरून तो पुन्हा कधीच कर्जबाजारी होणार नाही. यासाठी शाश्वत सिंचनाची व विजेची सोय जलसंधारणाच्या माध्यमातून केल्यानंतर कुठल्याही प्रकारची कर्जमाफी करण्याची वेळ पुन्हा आपल्यावर येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून ११० गावांत होणाºया २६२ कोटी रुपये खर्चाच्या जलसंधारण कामाच्या शुभारंभप्रसंगी लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बजाज उद्योग समूहाचे उपाध्यक्ष मधुर बजाज, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रशांत बंब, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, आ. अतुल सावे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
रविवारी दुपारी दोन वाजता गंगापूर तालुक्यातील रांजणगाव पोळ येथील लघु प्रकल्पामधील गाळ काढण्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. बजाज फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून करण्यात येणाºया कामातून या प्रकल्पातील दीड लाख घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. काढण्यात आलेला गाळ १२५ क्षेत्रावर पसरविला जाणार असल्याने तेथील जमिनीची सुपीकता वाढणार आहे. या कामावर एकूण ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रसामग्री कार्यरत असणार आहे.
जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी यांनी प्रास्ताविकातून बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून होणाºया जलसंधारण, महिला व युवकांच्या सशक्तीकरणाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच गंगापूर तालुक्यातील ११० गावांमध्ये २६२ कोटी रुपये खर्चाची सदरील योजना राबवून घेण्यात आ. प्रशांत बंब यांचे विशेष प्रयत्न असल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले.
गेल्या डिसेंबर महिन्यात महाआरोग्य शिबिरात आजाराचे निदान झालेल्या अनेक रुग्णांपैकी एक हजार रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, येत्या काही महिन्यांत उर्वरित सर्व रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती आ. बंब यांनी यावेळी दिली.
पोलीस ठाणे, उड्डाणपूल, ब्रह्मगव्हाण योजना मंजूर करणार
लासूर स्टेशनसह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व २५ हजार एकर सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच सदर योजना सुरू करणार असल्याचे सांगून, तसेच लासूर स्टेशन येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल व पोलीस ठाणे मंजूर करण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, सुनील लांजेवार, पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड, उपसभापती संपत छाजेड, तहसीलदार चंद्रकांत शेळके, डॉ. बन्सीलाल बंब, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव, नारायण वाकळे, मदनलाल लोढा, दिलीप पवार, रज्जाक पठाण, रवी चव्हाण, पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे, सावळीराम थोरात, उपसरपंच नितीन कºहाळे, पांडुरंग कुकलारे, नगरसेवक प्रदीप पाटील, मारुती खैरे, अभय राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आ. बंब यांनी केले तर आभारप्रदर्शन चंद्रशेखर त्रिपाठी यांनी केले.
दरम्यान, लासूर स्टेशन येथे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार होता. परंतु कार्यक्रमाचे आयोजन बजाज फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. बजाज संस्थेचे सामाजिक कार्य पाहता त्यांच्या कार्यात अडथळा नको म्हणून निषेध नोंदविण्याचा कार्यक्रम रद्द केल्याचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांनी सांगितले.
चौकट...
समाजाला होणारा फायदा आनंददायी - मधुर बजाज
बजाज कंपनी व कंपनीचे कार्यालय ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी सामाजिक कार्यात आपले अग्रगण्य काम असले पाहिजे, अशी बजाज कुटुंबियांची धारणा आहे. या कामामुळे समाजाला होणारा फायदा मोठा आनंददायी आहे, असे यावेळी मधुर बजाज यांनी सांगितले.