जिल्ह्यात यंदाही दुष्काळच..!
By Admin | Published: September 10, 2016 12:27 AM2016-09-10T00:27:03+5:302016-09-10T00:28:47+5:30
विजय सरवदे, औरंगाबाद अजूनही मोठ्या पावसाचे काही नक्षत्र शिल्लक आहेत; परंतु यापुढे मोठे पाऊस झाले तरी केवळ दरवाजांअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सर्व पाणी वाहून जाणार आहे.
विजय सरवदे, औरंगाबाद
यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस झाला. अजूनही मोठ्या पावसाचे काही नक्षत्र शिल्लक आहेत; परंतु यापुढे मोठे पाऊस झाले तरी केवळ दरवाजांअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सर्व पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीण नागरिकांच्या नशिबी पुन्हा दुष्काळ आणि पाणीटंचाई कायम राहील, हे मात्र नक्की!
मागील काही वर्षांपासून अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे चोरीला गेलेले आहेत, तर काहींचे दरवाजे तुटलेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पावसाचे पाणी अडवण्यास जिल्हा परिषदेला अपयश येत होते. गेल्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता जि.प.चे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे बदलण्याचा निर्णय घेतला. ३५०० दरवाजे खरेदी करण्यासाठी उपकरातील तब्बल २.५ कोटी रुपये, तर दरवाजांना रबरी सील बसविण्यासाठी ५० लाखांची तरतूदही करण्यात आली.
त्यानुसार जि.प.च्या सिंचन विभागाने दरवाजे खरेदीसाठी अडीच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता घेण्यासाठी ते जलसंधारण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले होते. या प्रक्रियेला जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला; पण अद्यापही तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे दरवाजे खरेदीची प्रक्रिया ठप्प राहिली. आता तांत्रिक मान्यता मिळाली तरी तिचा या वर्षासाठी फारसा उपयोग होणार नाही. नियमानुसार आॅक्टोबर महिन्यामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करावे लागतात. ज्यामुळे त्यात पाणी अडून भोवतालची जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होते. आता तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेला ई- टेंडरिंग करावी लागेल. त्यानंतर दहा दिवसांनी निविदा उघडल्या जातील. पुढे सर्वसाधारण सभेची दरवाजांच्या दरास मान्यता घ्यावी लागेल. पुढे मग पुरवठादार संस्थेस पुरवठा आदेश द्यावे लागतील. तेथून पुढे ४५ दिवसांच्या आत दरवाजांचा पुरवठा करून ते बसवावे लागतील. तोपर्यंत आॅक्टोबर महिना उलटून जाईल आणि दरवाजे न बसवल्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सारे पाणी वाहून जाईल. परिणामी, कोल्हापुरी बंधारे नजीकची लाखो एकर शेती पुन्हा सिंचनापासून वंचित राहणार. काही बंधाऱ्यांना दरवाजे आहेत; पण रबरी सील खराब झाल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. किमान रबरी सील खरेदीची प्रक्रिया जिल्हा परिषदेने राबवणे अपेक्षित होते; पण रबरी सील खरेदीची प्रक्रियाही थांबलेली आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याच्या नशिबी दरवर्षाप्रमाणे यंदाही दुष्काळच राहणार आहे, हे विशेष!