दुष्काळदाह ! पाण्याअभावी ५ वानरांचा सोयगावात तडफडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 07:49 PM2019-06-13T19:49:10+5:302019-06-13T19:50:31+5:30
वन विभागाकडून कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी टाकण्याचा उपक्रम हाती घेतला होता; परंतु नंतर तो ठप्प झाला.
सोयगाव (औरंगाबाद ) : सोयगावच्या जंगल पायथ्याशी वसलेले वन विभागाचे पाणवठे कोरडेठाक झाले असून जंगलातही पाणी राहिलेले नाही. त्यामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या पाच वानरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
दुष्काळ व कडक उन्हामुळे वन्यप्राण्यांची होरपळ वाढली आहे. सोयगाव वनपरिक्षेत्र हद्दीत पाच वानरांचा गुरुवारी दुपारी तडफडून मृत्यू झाल्यानंतर वन विभागाच्या पथकाकडून पंचनामा करण्यात आला. सोयगाव भागातील कृत्रिम पाणवठे दोन महिन्यांपासून कोरडेठाक झाले आहेत. त्यातच जंगल भागात पाण्याचा स्रोत मंदावल्याने वन्यप्राण्यांची तहान घशातच अडकून आहे. वन विभागाकडून कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी टाकण्याचा उपक्रम हाती घेतला होता; परंतु नंतर तो ठप्प झाला. यामुळे या वानरांना प्राणास मुकावे लागले.
केवळ नऊ पाणवठे
सोयगाव वनपरिक्षेत्र विभागात अजिंठ्याच्या डोंगर पायथ्याशी घनदाट जंगलात वन विभागाचे केवळ नऊ पाणवठे उभारले असून, वन्यप्राण्यांची संख्या पाहता हे पाणवठे अपूर्ण पडत आहेत. त्यामुळे यंदाचा उन्हाळा वन्यप्राण्यांसाठी धोक्याचा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी घोसला शिवारात विहिरीत रानमांजर पाण्यासाठी पडली होती. काही भागात हरणांचे कळप पाण्यासाठी भटकंती करीत आहेत; परंतु पाणीच नसल्याने त्यांचे हाल सुरूच आहेत.