दुष्काळी मराठवाड्यात शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी अहमदनगरच्या उसावर अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:38 PM2019-06-12T13:38:22+5:302019-06-12T13:46:07+5:30
भाव कडाडले तरी पशुधनासाठी खरेदी
लासूर स्टेशन (औरंगाबाद ) : पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांच्या वैरणासाठी लागणाऱ्या उसाचे भाव कडाडले असून मंगळवारी लासूर स्टेशन येथे प्रति टन उसासाठी ४४०० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागले.
आधीच दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दररोज २५० टनाहून अधिक उसाची हातोहात विक्री होत आहे. तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा शेतकऱ्यांना शेतमाल तर झालाच नाही. पाठोपाठ वर्षभर पुरेल इतका चाराही झाला नाही. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांपुढे जनावरांना सांभाळण्याचे मोठे संकट उभे ठाकले होते. मोठी कसरत करीत हिवाळ्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांनी जनावरांची व्यवस्था केली. परंतु आज रोजी वाढलेल्या चाऱ्याच्या भावामुळे शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे.
नगर जिल्ह्यातून येतो ऊस
ऊस घेण्यासाठी येथे स्थानिक शेतकऱ्यांसह वैजापूर, देवगाव, कन्नड व खुलताबाद भागातून शेतकरी येत आहेत. त्यामुळे येथे येणारा ऊस खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडत आहे. त्यामुळे सहाजिकच उपलब्ध असलेला ऊस हा चढ्या भावाने विक्री होत आहे. स्वत:कडे चारा उपलब्ध नसल्यामुळे मिळत असलेल्या भावानुसार शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, भेंडा, शेवगाव परिसरातून आज आलेला ऊस तब्बल चार हजार चारशे रुपये प्रति टनाने हातोहात विक्री झाला आहे.
पर्याय नसल्याने चढ्या भावाने खरेदी
गुरांना खाऊ घालण्यासाठी सध्या आमच्याकडे काहीच शिल्लक नसल्यामुळे मिळत असलेल्या भावात ऊस घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असे पोटूळ येथील शेतकरी जगन्नाथ कापसे यांनी सांगितले. दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे इतक्या मोठ्या भावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे, असे धामोरी येथील शेतकरी ज्ञानेश्वर कोकरे यांनी सांगितले.