Drought In Marathawada : ‘ताई, तुमीबी बगा की खारं पाणी कसं लागतंय ते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 01:56 PM2019-04-07T13:56:03+5:302019-04-07T14:02:06+5:30

ग्रामस्थ म्हणतात,‘यंदाचा दुष्काळ लई वाईट...’

Drought in Marathawada : sister let taste salty water yourself ! | Drought In Marathawada : ‘ताई, तुमीबी बगा की खारं पाणी कसं लागतंय ते!

Drought In Marathawada : ‘ताई, तुमीबी बगा की खारं पाणी कसं लागतंय ते!

googlenewsNext
ठळक मुद्देसिरेसायगावातील भीषण वास्तव सध्या मराठवाडा भीषण दुष्काळ परिस्थितीला सामोरा जात आहे.

- अबोली कुलकर्णी-शेलदरकर

औरंगाबाद : ‘१९७२ वर्षानंतरचा लई भीषण दुष्काळ हाय ताई... आत्तापतूर पाह्यला नाय असा बेक्कार दुष्काळ हाय हा... पाण्याचा थेंब नाय घरात... लेकरांना हंडाभर पाण्यासाठी लई लांब जावं लागतया... आमच्या हाताला काईबी काम नाई बगा... कुणाच्या लग्नाला जावं मनलं तर हातात एक रुपयाबी न्हाई... आमचं वावर, जनावरं, लेक रं लईच होरपळलेत बगा...’ हे उद्गार आहेत लासूर गावानजीक असलेल्या दुष्काळग्रस्त सिरेसायगावातील एका महिलेचे... 

सध्या मराठवाडा भीषण दुष्काळ परिस्थितीला सामोरा जात आहे. पाणीटंचाई, शासकीय योजनांचा अभाव, पीक विमा, चाराटंचाई याबाबींपासून ग्रामस्थ दुरावल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. अशाच काही दुष्काळग्रस्त गावांची माहिती घेतली असता पालखेड, लासूर आणि सिरेसायगाव या गावांची पाहणी करायचे ठरवले. औरंगाबादपासून साधारण ५० कि.मी. अंतरावर असलेल्या दुष्काळग्रस्त सिरेसायगाव या गावाला भेट दिली. एक हजार वस्ती असलेले हे गाव. या गावात जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डांबरी रस्ता नाही. ग्रामस्थ पायवाटेनेच ये-जा करतात. गावाच्या पाटीपासून मात्र सिमेंटचा रस्ता आहे. गावात पोहोचताच जागोजागी ग्रामस्थ विहिरीवरून पाण्याचे हंडे भरताना दिसले. दहा वर्षांच्या मुलीपासून ते ८० वर्षांच्या आजीपर्यंत सगळे जण पाण्याची सोय लावण्यात व्यस्त होते. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्याकडून एकंदरीत गावातील पाण्याची व्यवस्था, रस्ते, चाऱ्याची टंचाई, ग्रामस्थांची शेती, उत्पन्न, पीकपाणी, कोण-कोण शासकीय योजनांपासून वंचित याबाबी जाणून घेतल्या. 

जवळपास ३० घरांतील ग्रामस्थांसोबत चर्चा केल्यानंतर मथुराबाई जगताप यांचे घर गाठले. साधारण ५५ वर्षांच्या या बाई. त्या शेतावर कामाला जात असत. दररोजची मजुरी १०० रुपये त्यांना मिळते. मात्र, दुष्काळामुळे आता शेतात कुठलेच पीक नाही. त्यामुळे कुठलेच कामही नाही. त्या म्हणाल्या की, ‘काय सांगू ताई, औंदा लईच तरास हाय बगा दुष्काळाचा... हाताला कायबी काम उरलं न्हाई... नुसतं करा, खा अन् घरात बसा... पाण्याचीबी लई वानवा हाय... आमाला प्यायचं पाणीबी लई लांबून आणावं लागतया... टँकर येतं; पण त्याला लई गर्दी राहतीया... जनावरांचबी लई अवघड झालंय... आमाला कितीतरी जनावरं दुष्काळापायी विकून टाकावी लागली... त्यांना तरी पानी कुठलं द्यायचं हो आमी? ताई, तुमी येऊन बगा, किती खारं पाणी हाय ते... कसं पिनार वं... कु नीबी पिऊ शकणार नाय... कवा ह्ये एकदाचे चार महिने जातेत असं झालंय बगा... आतापतूर कदीबी नाय बघितला असा दुष्काळ... कुणी लग्नाला चला म्हनलं, तर हातात एक रुपयाबी नाय बगा...’ मथुराबार्इंनी स्वत:च्या अनुभवातून अख्ख्या मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता सांगितली.

निवडून कुनीबी आला, तर फरक नाई पडत
लोकसभा निवडणुकांबाबत त्या म्हणाल्या की, ‘ताई, निवडून कुनीबी येऊ... आमाला गरिबाला काय त्याचा फायदा? श्रीमंत लोक खिसे भरून गरम करू लागले... गरिबाला काय हाय त्याचं? आमाला काहीबी म्हटले की आमी निगतो... पैशे देणं-घेणं सगळंच एकदम आलबेल राहतंय बगा... आता काय सांगणार अजून? कुनीबी निवडून आलं तरीबी आमच्यासाठी कोन काम करणार? आमाला दुष्काळाच्या झळा बसतायेत. 
एवढं मातर खरं...’ 

पाण्याचा अभाव : भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्राने अनेकदा दुष्काळ पाहिला आहे; पण यावर्षीच्या दुष्काळाने कहर केला आहे. पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याचा अभाव. जागोजागी जनावरांना चारा छावणीत नेऊन ठेवण्याची वेळ. ग्रामीण भागात रोजगाराचा अभाव व त्यामुळे जवळच्या शहरांकडे ग्रामस्थांची होणारी वाटचाल, असे यंदाच्या दुष्काळाचे चित्र दिसून येत आहे. 

अडचणींची वाट : १९७२ ला असाच मोठा दुष्काळ पडला होता. पाण्याचे दुर्भिक्ष, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, टँकरचे वाढते प्रमाण, शेतात कुठलेही पीक नाही, शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, अपुरी मजुरी, स्थलांतरितांचा प्रश्न, शासकीय योजनांपासून वंचित, पीकविम्याचा मोबदला नाही, अशा सर्व अडचणींमधून शेतकरी आपला मार्ग काढत आहेत. काही ग्रामस्थांनी तर अपुऱ्या पैशांअभावी सोन्याचे दागिनेदेखील गहाण ठेवले आहेत. मायबाप सरकारपर्यंत हे कधी पोहोचणार?

Web Title: Drought in Marathawada : sister let taste salty water yourself !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.