Drought In Marathwada : कपाशी भुईसपाट, मकाही वाळला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 05:16 PM2018-10-08T17:16:03+5:302018-10-08T17:17:51+5:30
रोजगारासाठी तरुणांचे शहरात दररोज अपडाऊन, शेतकऱ्यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. ही काळीज भेदणारी विदारक स्थिती आहे कन्नड तालुक्यातील कानडगाव (क.) गावची.
- सुरेश चव्हाण, कानडगाव (क.), ता. कन्नड, जि. औरंगाबाद
दुबार पेरणी करूनही पीक हातात नाही. कपाशी भुईसपाट झाली, तीन महिन्यांत कपाशीची उंची दीड फूट, मका वाळला. रबीही धोक्यात. चारा नसल्याने पशुधन विकण्याची वेळ. रोजगारासाठी तरुणांचे शहरात दररोज अपडाऊन, शेतकऱ्यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. ही काळीज भेदणारी विदारक स्थिती आहे कन्नड तालुक्यातील कानडगाव (क.) गावची.
चापानेर महसूल मंडळात कन्नड आणि वैजापूर तालुक्यांच्या सीमेवरील हे गाव. शिवारातील जमीन कोरडवाहू त्यामुळे पावसावरच शेती अवलंबून आहे. यावर्षी सुरुवातीला पडलेल्या पावसावर कापूस, मका पिकाच्या लागवडीवर खर्च केला मात्र पेरणीनंतर पावसाने दोन महिने पाठ फिरविली. त्यामुळे पिके वाळून गेली. दोन महिन्यांनंतर पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, तर काहींनी पेरणीच केली नाही. ज्यांनी पेरणी केली त्यांची पिकेही उगवली. मात्र पावसाने पुन्हा तडी दिली. परिणामी कपाशीची वाढ खुंटली तर मका वाळून गेला. आता रबीची पेरणी झाली आहे. ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी झाली मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे. शेती बागायत करण्याचा प्रयत्न झाला मात्र जमिनीतील खाऱ्या पाण्याने त्याला सुरूंग लावला.
गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वैजापूर तालुक्यातील भटाणा तलावाच्या खाली नदीच्या काठावर विहीर खोदून पाणीपुरवठा योजना करण्यात आलेली आहे. मात्र, पाणी नसल्याने सुमारे एक वर्षापासून ही योजना बंदच आहे. गावातील बोअर अधिग्रहण करण्यात आलेला असून त्याद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरूआहे. मात्र दोन महिन्यांपर्यंतच पाणी पुरेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. खरीप हंगामातील मका, बाजरी या पिकांमुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे सहज शक्य होते; परंतु यावर्षी पाऊस न पडल्यामुळे ही पिके आलीच नाहीत. शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे अशक्य झाल्याने दारासमोर लक्ष्मीचे उपासमारीने होणारे हाल शेतकऱ्यांना असह्य होत आहेत. त्यामुळे शेतकरी लाखमोलाचे पशुधन कवडीमोल भावात विक्री करू लागले आहेत.
उत्पन्नात ६० टक्के घट
कन्नड तालुक्यात कापूस आणि मका ही प्रमुख पिके घेतली जातात. जुलै ते आॅगस्ट या कालावधीत २५ ते ३५ व आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत ३० ते ३५ दिवसांचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे कापूस पिकाच्या उत्पन्नात ३५ ते ४० टक्के, तर मका आणि बाजरी पिकाच्या उत्पन्नात ६० ते ६५ टक्के घट येईल.
-एस.एम.पेंडभाजे, तालुका कृषी अधिकारी, कन्नड
बळीराजा काय म्हणतो?
- माझ्याकडे ३ एकर शेती आहे. दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी, दरवर्षी येणारा अवेळी पाऊस नवीन निर्णय घ्यायला भाग पाडतो. यावर्षी तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. घर कसे चालवायचे, शासनाने दुष्काळ जाहीर करावा. -संजय साहेबराव नलावडे
- पावसाच्या लहरीपणापुढे शेतकरी हतबल झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील तरुण कामासाठी औरंगाबाद येथे अप-डाऊन करीत आहेत. गावात मग्रारोहयोची कामे सुरु करावी. -अप्पासाहेब नलावडे
- कापूस लागवड केल्यानंतर दोन महिन्यांनी पाऊस पडला. पीक वाया गेल्याने दुबार पेरणी करुन मका लावला. मका लागवडीनंतर दीड महिना पाऊस न पडल्याने मकाही वाळून गेला. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण, दवाखाना, घरखर्च कसा भागवावा, चारा नसल्याने जनावरे कशी सांभाळावी, हीच चिंता झोपू देत नाही. -कैलास रामचंद्र नलावडे
- पेरणी वाया गेल्याने हातचेही गेले. आता काय करावे याची चिंता आहे. चारा छावणी सुरु झाली तरच जनावरे जगतील. -बालिका गोकुळ नलावडे