Drought In Marathwada : दुष्काळाची ‘झळ’ एकीकडे; मूल्यमापनाची ‘कळ’ दुसरीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 08:45 PM2018-10-19T20:45:23+5:302018-10-19T20:50:38+5:30
मराठवाड्यात जवळपास सर्वच गावे दुष्काळाच्या खाईत जाण्याची शक्यता आहे.
- विकास राऊत
औरंगाबाद : मराठवाड्यात जवळपास सर्वच गावे दुष्काळाच्या खाईत जाण्याची शक्यता आहे. असे असताना दुष्काळ मूल्यमापनाची ‘कळ’ (ट्रीगर) एकीकडे असून, दुष्काळाच्या ‘झळा’ मात्र दुसरीकडे असल्याच्या तक्रारी विभागीय प्रशासनापर्यंत येऊ लागल्या आहेत. आॅक्टोबर २०१७ च्या अध्यादेशाच्या अधीन राहून सरकारी यंत्रणा १० टक्के गावांच्या अनुमानावरून दुष्काळ मध्यम किंवा गंभीर असल्याचा अंदाज बांधत आहे. या मूल्यमापनात मोठी गडबड होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे निर्माण होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. हे सगळे वेळीच थांबविण्याची मागणी मराठवाड्यातील ग्रामीण भागातून होत आहे.
दुष्काळ मोजण्यासाठी जी कळ लावली आहे, ती तालुक्याला लावली आहे. तालुक्याच्या विवरणानुसार दुष्काळाचे मूल्यमापन कसे होणार? उदाहरण पाटोदा तालुक्याचे घेतले तर असे दिसते की, तेथे पाण्याखाली १० टक्के किती गावे असतील, उर्वरित ९० टक्के गावे कशी मोजणार, याची अडचण येत आहे. मंडळनिहाय, सजानिहाय गावांची अवस्था पाहिली जात नाही. शितावरून भाताची परीक्षा अशा पद्धतीने दुष्काळाचे मूल्यमापन होत आहे.
विभागात खरिपात ६३ टक्के पाऊस पडला आहे. रबीसाठी तर पाऊसच पडलेला नाही. रबीसाठी मातीमध्ये जो ओलावा लागतो, तो निर्माण झालेला नाही.
मराठवाड्यात दुष्काळाची वरवर होत असलेली पाहणी आणि कागदोपत्री अहवाल नुकसानदायक ठरू शकते. पाऊस किती पडला, पिकांची परिस्थिती हा भाग वेगळा; परंतु हंगामनिहाय उत्पादनाचा हिशेब होेणे अवघड आहे. तळागातील शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार होताना दिसत नाही. रबीतील पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. तालुक्याच्या ठिकाणी कळ लावून पूर्ण तालुक्याची पाहणी होणे अशक्य आहे. विभागीय प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कृषी आयुक्त सत्येंद्रसिंह प्रताप यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली; परंतु त्यावर काही परिणाम झाला नाही.
पावसाची आकडेवारी बेवसाईटवर अपलोड करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा कार्यक्रम सुरू आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सचिव आहेत. पैसेवारी किती आली, पाऊस किती पडला, पीक कापणीची आकडेवारी यानुसार कळ लावली जात आहे. पिकांचे उत्पादन, भूजल पातळी याची आकडेवारी गृहीत धरण्यात येत आहे. तालुक्यात बसून पूर्ण गावांचा पाऊस कसा मोजणार, भौगोलिकदृष्ट्या पावसाचा समतोल कसा तपासणार, हा प्रश्न आहे.
मंडळनिहाय तरी पाहणी व्हावी, अशी मागणी होत आहे. प्रत्येक मंडळात १८ ते २० गावे येतात. ४ ते ५ सजा असतात. त्यानुसार तरी पाहणी व्हावी. म्हणजे मराठवाड्यात नेमके दुष्काळाची अवस्था कशी आहे, याचा अंदाज लागेल. हा सगळा विचित्र कारभार सुरू असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची तळमळ आहे; परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांची चोहोबाजूंनी कोंडी होत आहे. कळ तालुक्याऐवजी मंडळनिहायपर्यंत पोहोचावी. ७६ तालुक्यांत किती पाऊस पडला, यानुसार दुष्काळाचा अंदाज कसा लावला जाणार, याचा विचार होणे गरजेचे आहे.
मराठवाड्यातील भौगोलिक परिस्थिती अशी
एकूण जिल्हे : ८
शेतकरी किती : ६२ लाख अंदाजे
खरीप व रबी पेरणी : ६० लाख हेक्टरच्या आसपास
तालुक्यांची संख्या : ७६
गावांची संख्या : ८५३३
मंडळांचा आकडा : ४६३
आजवर झालेला पाऊस : ६३ टक्के
खरीप हंगाम गेलेली गावे : २९५८