Drought In Marathwada : पावसाअभावी खरीप गेला, रबीही रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:08 PM2018-10-27T13:08:25+5:302018-10-27T13:08:35+5:30

दुष्काळवाडा : पिके गेली, निदान प्यायला पाणी तर हवे, याचीही चिंता सतावत आहे. हे भयावह चित्र आहे औरंगाबाद तालुक्यातील दुधड या गावचे.

Drought in Marathwada: Kharipa season went without rain, Rabi season also on natures faith | Drought In Marathwada : पावसाअभावी खरीप गेला, रबीही रामभरोसे

Drought In Marathwada : पावसाअभावी खरीप गेला, रबीही रामभरोसे

googlenewsNext

- रत्नाकर तांबट, दुधड, ता. जि. औरंगाबाद

पावसाअभावी खरीप पीक हातचे गेले, रबी हंगाम रामभरोसे असल्याने येणारे वर्ष डोळ्यात अश्रू आणणारे आहे. शेतीत पैसा ओतून ओतून बळीराजाचा खिसा खाली झाला आहे. कर्ज तरी किती दिवस घ्यावे, ते फेडायचे कोठून, संसाराचा गाडा हाकलण्यासाठी पैसा तर लागणारच, त्यात दुष्काळ पडला. आता करावे तर काय, अशा एक ना अनेक विवंचनेत शेतकरी सापडला आहे. पिके गेली, निदान प्यायला पाणी तर हवे, याचीही चिंता सतावत आहे. हे भयावह चित्र आहे औरंगाबाद तालुक्यातील दुधड या गावचे.

कपाशी करपल्याने कपाशीला पाते लागले नाहीत. फळबागा पाण्याविना संकटात सापडल्या आहेत. यंदा औरंगाबाद तालुक्यावर दुष्काळ छाया गडद झाली आहे. पावसाळ्याचे चार महिने उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. गावाजवळ मध्यम प्रकल्प असून, त्यातील पाणीसाठा मृत आहे.
औरंगाबाद शहरापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर असलेल्या दुधड गावाची लोकसंख्या ३,२०० आहे. दुधड गाव पूर्वी सधन म्हणून ओळखले जायचे. पूर्वी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते; परंतु निर्सगाच्या लहरीपणाचा फटका या गावाला बसला. आज उसाचे क्षेत्र इतिहासजमा झाले आहे. येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. फळबागांना पाणी लागते म्हणून शेततळे केली; परंतु पावसाने दगा दिल्याने विहिरींनी पावसाळ्यातच तळ गाठल्याने शेततळ्यात पाणी कोठून आणायचे व फळबागा कशा जगवायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

दुधड येथे मजुरांची संख्या फारशी नाही. स्वत:ची शेती करून उदारनिर्वाह करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकापाठोपाठ रबी हंगामही हातातून गेला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांचा चारा प्रश्न गंभीर बनल्याने येथील शेतकरी मातीमोल भावात जनावरांची विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभी पिके पाण्याविना जळून जात आहेत. कपाशीची वाढ तर एक ते दीड फुटापर्यंत झाली. वाढ झाल्यानंतर पाणी नसल्याने जागेवरच उभी कपाशी करपून गेली.

चाऱ्यासाठी दुसऱ्याच्या शेतात फुकट सोंगणी 
जून-जुलैमध्ये थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावरच खरीप पिकांची कापूस, तूर, मका, बाजरी, मुगाची पेरणी केली. मात्र, पावसाअभावी हातातोंडाशी येणारा थोडाफार घासही निसर्गाने हिरावला. तलाव व विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुधड परिसरात खरीप हंगामातील बाजरी, मक्याचे उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेरगावातून आतापासूनच चाऱ्याची जमवाजमव सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जनावरांची संख्या जास्त आहे ते शेतकरी स्वत:हून दुसऱ्याच्या शेतातील बाजरी व मका चाऱ्याची फुकट सोंगणी करीत आहेत.

लहुकी नदी व प्रकल्प कोरडाठाक
दुधड गावाला वरदान म्हणून लाभलेला लहुकी मध्यम प्रकल्प यावर्षी प्रथमच कोरडा पडला आहे. यावर्षी धरणातच पाणी नसल्यामुळे लहुकी नदी गेल्या एक वर्षापासून कोरडीठाक पडली आहे. नदीला वाहते पाणी नसल्याने नदीकाठच्या विहिरीला पावसाळ्यात एक थेंबही पाणी आलेले नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या लहुकी धरणातील विहिरीने पावसाळ्यातच तळ गाठल्याने गावाला एक दिवसाआड पाणी मिळत आहे. पाणीटंचाईने बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात राहणे पसंत केले आहे.

जनावरांसाठीही चारा नाही 
तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती असून, खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रबी पिके घेण्यासाठी पाणी नाही. मका पिकांची शाखीय वाढ कमी झाल्याने जनावरांसाठी उपलब्ध चारा ५० टक्के कमी झाला आहे.
-विश्वास जाधव, तालुका कृषी अधिकारी 

बळीराजा काय म्हणतो?
- जुलैच्या पहिल्या आठवड्यातच तूर, मका, कपाशी व मूग आदी पिके करपून गेली. फळबागा पाण्यावाचून वाळून जात आहेत. खरीप पिकावर केलेला खर्चही पूर्णपणे वाया गेला.  -बाबासाहेब चौधरी 

- पावसाळा संपल्यात जमा आहे. परतीचा पाऊस न आल्याने पाण्याची तीव्र पाणीटंचाई भासत आहे. माणसांबरोबर गुरांना पाणी कोठून आणावे, याचीच चिंता लागली आहे. -निवृत्ती बोरडे  

- पावसाअभावी उभी पिके करपून गेली. खरीप पिकावर केलेला खर्चही हातात पडणार नसल्याने आर्थिक चणचण आतापासूनच जाणवत आहे. -शिवनाथ चौधरी

- दोन वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यावर्षीजून महिन्यातच धूळपेरणी केली होती; परंतु पाण्याविना तिही हातून गेली.     -पांडुरंग चौधरी 

औरंगाबाद तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान : ६५५ मि.मी.
२०१३ - ७१४. ८ मिमी 
२०१४ - ४१७ मिमी 
२०१५ - ६१४ मिमी 
२०१६- ७२० मिमी 
२०१७ - ६५४ मिमी
२०१८ - ४६३. ९० मिमी 

- १२६४.५१ हेक्टर दुधडचे भौगोलिक क्षेत्र
- ४४ % दुधडची आणेवारी 

Web Title: Drought in Marathwada: Kharipa season went without rain, Rabi season also on natures faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.