Drought In Marathwada : मराठवाड्यात टँकरविना पर्याय नाही; ४० लाख ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:07 PM2019-04-26T12:07:48+5:302019-04-26T12:08:29+5:30
गावांची तहान वाढली; १७८७ गावांत वणवण
औरंगाबाद : चैत्र समाप्ती आणि वैशाखाच्या तोंडावर मराठवाड्यातील ग्रामीण भागाची तहान वाढली आहे. दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भयावह असल्यामुळे टँकरविना नागरिकांना कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. मराठवाड्यातील सुमारे ४० लाख लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. या दशकातील सर्वाधिक त्रस्त असा दुष्काळ यावर्षी आहे.
१७८७ गावे आणि ६२५ वाड्यांमध्ये २ हजार ४७० टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. वैशाख महिन्यात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यात दर आठवड्याला ७२ टँकर आणि ८३ हजार ९३४ नागरिकांची ३७ गावे आणि १४ वाड्यांची भर पडते आहे. विभागात सर्वाधिक औरंगाबाद जिल्हा दुष्काळात होरपळतो आहे. जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. १३७३ पैकी ६६३ गावे आणि २४९ वाड्यांवर ९८० टँकरचे पाणी द्यावे लागते आहे. १५ लाख ६ हजार ९७२ पाणी दिले आहेत. ७४७ टँकर ५४९ गावे आणि २५५ वाड्यांवर सुरू आहेत. त्याखालोखाल जालना जिल्ह्यातील ७ लाख ९९ हजार ७५३ नागरिकांना ४४६ टँकरने पाणीपुरवठा होतो असून, जिल्ह्यातील ३७६ गावे आणि ७८ वाड्या तहानल्या आहेत.
विभागातील प्रकल्पात ३.७२ टक्केच पाणी
विभागातील सर्व मिळून ८७२ प्रकल्पांत ३.७२ टक्के पिण्याचे पाणी शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत ४ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ३.१५ टक्के, ७४९ लघु प्रकल्पांत ३.२१ टक्के, तर १३ गोदावरी नदीवरील बंधा-यांत ४.४७ टक्के पाणीसाठा आहे. तेरणा, मांजरा आणि रेणा नदीवरील २४ बंधाºयांत एकही थेंब पाणी नाही. ३०४ दलघमी पाणीसाठा सध्या सर्व प्रकल्पांत आहे.
जिल्हा लोकसंख्या गावे/वाड्या टँकर
औरंगाबाद १५०५९७२ ६६३/२४९ ९८०
जालना ७९९७५३ ३७६/७८ ४४६
परभणी ४७४४७ २१/५ ४२
हिंगोली ४२१७६ २०/८ ३४
नांदेड १११९१३ ४३/१८ ७३
बीड १०८५९४५ ५४९/२५५ ७४७
लातूर ८१२४९ २८/७ ३८
उस्मानाबाद २३८९४९ ८७/५ ११०
एकूण ३९१४४०४ १७८७/६२५ २४७०