Drought In Marathwada : म्हसणात आणलेला मुर्दा अन् बाजारात नेलेले जनावर घरी नाही नेता येत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 07:31 PM2018-12-15T19:31:24+5:302018-12-15T19:36:07+5:30

दुष्काळवाडा : दुभत्या म्हशी बाजारात उभ्या करून गिऱ्हाईकाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडून निघालेले हे बोल दुष्काळाची भीषणता पटवून देत होते.

Drought in Marathwada : Pet in market doesn't get back to home;a deadly stories of farmers from animal bazaar | Drought In Marathwada : म्हसणात आणलेला मुर्दा अन् बाजारात नेलेले जनावर घरी नाही नेता येत !

Drought In Marathwada : म्हसणात आणलेला मुर्दा अन् बाजारात नेलेले जनावर घरी नाही नेता येत !

googlenewsNext
ठळक मुद्देजनावरांच्या बाजारातील करुण कहाण्या

- भागवत हिरेकर

औरंगाबाद : सगळी मदार पावसावर. जुळवाजुळव करून पेरण्या करायच्या अन् पाऊस बेपत्ता होतो, पण मग खचून चालत नाही. देणीघेणी वाढून बसलेली असतात. त्या टाळता येत नाहीत. जिथे माणसांचेच हाल तिथे जनावरे कशी सांभाळायची? त्यांना बाजार दाखवावा लागतो. जशी किंमत मिळेल तशी ती द्यावी लागतात. म्हसणात आणलेला मुर्दा फुकावाच लागतो. विकायला आणलेला शेतमाल आणि जनावराचेही तेच आहे. दुभत्या म्हशी बाजारात उभ्या करून गिऱ्हाईकाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडून निघालेले हे बोल दुष्काळाची भीषणता पटवून देत होते.

औरंगाबाद शहरातील छावणीत दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. बाजूलाच जनावरांचाही बाजार असतो. या बाजारात म्हशी आणि शेळ्याच विकायला येतात. विशेषत: म्हशी विकायला आणणाऱ्यांत व्यापाऱ्यांचे प्रमाण जास्तच; पण या गर्दीतून फेरफटका मारल्यानंतर गोठ्यातील जनावरे घेऊन उभे असलेले शेतकरी लगेच उमटून पडले. औरंगाबादच्या उंबरठ्यावरील गावांबरोबरच अगदी चाळीसगावहून आलेले शेतकरीही होते. बाजारात गर्दीत एका टोकाला म्हैस सिमेंटच्या खांबाला बांधून उभे असलेले तुकाराम शिंदे दिसले. शून्यात बघत कुठल्या तरी विचारात गढून गेलेले. त्यांना बोलते केले. गिऱ्हाईकाकडे नजर ठेवून ते बोलत होते. पाणी नाही. पीक कसे येणार? पेरणीसाठी, घरासाठी देणीघेणी केलेली. शेतातून काहीच आले नाही. कडब्याचेही हाल. मग जनावराला बाजार दाखविण्याशिवाय मार्ग उरत नाही, असे हताशपणे सांगत त्यांनी बोलणेच थांबवले. 

आजूबाजूला प्रत्येक जण आलेल्या गिऱ्हाईकाला म्हस फिरवून दाखवत होता. कुणी बळेच शेतकऱ्यांच्या हातात शंभर, पन्नास रुपयांची नोट दाबून सौदा फिक्स करण्याचा अट्टहास करीत होता. या गोंधळात एका शेतकऱ्याने मोबाईल दिला. घर नावाने नंबर आहे, तो लावून द्या, म्हणाला. मोेबाईलच्या डायल लिस्टमध्ये बघितले, तर पहिलेच नाव सावकार होते. चाळीसगावहून हा शेतकरी दोन म्हशी घेऊन आला होता. त्याचे हे बोलणे बराच वेळ सुरू होते.
ही सगळी आजबाजूला चर्चेची गुऱ्हाळं सुरू असताना दुभती म्हैस खुंट्याला बांधून एका उंचवट्यावर बसलेले फुलंब्रीचे किशोर चव्हाण दिसले. हाताच्या कवेत पाय घेऊन बसलेले चव्हाण मध्येच शेजाऱ्याशी बोलायचे. मध्येच शांत होऊन म्हशीकडे बघत बसायचे. त्यांच्याकडे पीक-पाण्याचा विषय निघाला. त्यांनीही पावसाचीच गोष्ट सांगितली. इतके तितके पिकते त्याला नीट दाम मिळत नाही. खर्च निघत नाही. मग हात-पाय हलवावेच लागतात. जेव्हा पर्यायच उरत नाही, तेव्हा जनावरे अशी बाजारात उभी करावी लागतात. दुष्काळात सापडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची हीच गत आहे, असे किशोर चव्हाण म्हणाले. त्यांच्या आजूबाजूला असलेली गर्दी, खरेदी- विक्रीची चर्चा अखंडितपणे सुरूच होती. या गर्दीत शेतकऱ्यांचा आवाज क्षीण झालेलाच दिसला. 

भावाचे गणितच कळत नाही
याच बाजारात चौक्याहून शंकर वाघ मित्राची म्हैस घेऊन आलेले. व्यापारी मेळ लागू देत नाही म्हणूून त्यांनी हाताशी एजंट धरला होता. वर्षभरापूर्वी छावणीच्याच बाजारातून त्यांनी ९० हजारांत ही म्हैस घेतली होती. दीड हजार भाडे देऊन सकाळी बाजार गाठला. व्यापारी आले त्यांनी पाडून मागितली. शेवटी एका शेतकऱ्यालाच ७५ हजारांत त्यांनी विकली. इतकी कमी कशी विकली? असे म्हणताच ते म्हणाले, आर्थिक चणचण असते. लोकांची देणी असतात. आता आणायचे दीड हजार घेतले. गिºहाईक नाही भेटल्यावर घरी न्यायचे म्हणजे पुन्हा हजारेक रुपये भाडे द्यावे लागणार. पुन्हा पुढच्या बाजारात हेच झाले तर? मुर्दा म्हसणात आणला की फुकावाच लागतो. परत घरी नाही नेता येत. हीच गत शेतमालाबरोबर जनावरांचीही आहे. शेतातला माल बाजारात आला की, भाव पडतो. माल संपला की, पुन्हा वाढतो. बाजारात आणलेला माल परतही नेता येत नाही. चोहीकडूनच कोंडी होते. भावाचे हे गणितच कळत नाही, शेतकरी तरी काय करणार? 

Web Title: Drought in Marathwada : Pet in market doesn't get back to home;a deadly stories of farmers from animal bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.