Drought In Marathwada : तिबार पेरणीही गेली वाया, मक्याचा झाला चारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 07:28 PM2018-10-15T19:28:49+5:302018-10-15T19:30:58+5:30

दुष्काळवाडा : सिल्लोड तालुक्यातील निल्लोड मंडळात सर्वात कमी ३७ टक्के  पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे

Drought in Marathwada: Third time sowing also get wasted | Drought In Marathwada : तिबार पेरणीही गेली वाया, मक्याचा झाला चारा !

Drought In Marathwada : तिबार पेरणीही गेली वाया, मक्याचा झाला चारा !

googlenewsNext

- श्यामकुमार पुरे, निल्लोड, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद

सिल्लोड तालुक्यातील निल्लोड मंडळात सर्वात कमी ३७ टक्के  पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, तालुक्यात केवळ ३४१ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे भीषण दुष्काळाची दाहकता बघून आतापासूनच शेतकऱ्यांच्या जीवाचा थरकाप होऊ लागला आहे. त्यांचे अवसान गळाले आहे. खरीप पिके हातची गेली असून, तिबार पेरणी करूनही मक्याचा चारा झाला आहे. शेतकरी मक्याची सोंगणी करण्याऐवजी चारा सोंगणी करताना दिसत आहेत. कापसाला कैऱ्याच लागल्या नाहीत. सोयाबीन, उडीद, मूग तर पूर्णत: वाया गेले आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. २ ते ३ कि.मी. अंतरावरील डोंगरातून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. उपलब्ध चाऱ्यात वर्ष निघणार नाही म्हणून शेतकरी जनावरे कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत.  

निल्लोड येथे लघु प्रकल्प असून, यातून सात गावांना पाणीपुरवठा केला जातो. जवळपास सर्वच प्रकल्प गेल्या ३ वर्षांत कधीच भरले नाहीत. यावर्षीसुद्धा प्रकल्प कोरडेठाक आहेत. निल्लोड प्रकल्पात ७ विहिरी असून, त्यांनीही तळ गाठला आहे. यामुळे पाणीपुरवठा योजना असून नसल्यासारख्या आहेत. या मंडळात टँकर सुरू करावे, अशी मागणी भर पावसाळ्यात सुरू झाली आहे.

निल्लोड मंडळात के-हाळा, कायगाव, गेवराई सेमी, बनकिन्होळा, बाभूळगाव परिसरात यंदा कुठे दुबार, तर कुठे तिबार पेरणी करावी लागली. तीनपट खर्च करून हाती काहीच न आल्याने शेतकरी खचला आहे. मुलांचे शिक्षण, लग्न, डोक्यावरील कर्ज कसे फेडावे, अशी चिंता त्यांना सतावत आहे. तालुक्याची आणेवारी केवळ ४३.२१ जाहीर झाली आहे. भर पावसाळ्यात तालुक्यातील ८ गावांत ११ टँकर सुरू आहेत. तालुक्यातील ६० टक्के  खरीप पिके हातची गेली आहेत. सोयाबीन, उडीद, मूग पूर्ण वाया गेले आहे. मका उभा आहे; पण त्याला काही सर्क लमध्ये कणसेच लागली नाहीत. कुठे कणसे दिसत असली तरी त्यात दाणे भरले नाहीत. कापसाची वाढ खुंटली आहे. पाणी नसल्याने २-४ पाती लगडली आहेत. फुले, पात्या कडक उन्हामुळे गळत आहेत.

तालुक्यातील केवळ खेळणा मध्यम प्रकल्पात १५.६२ टक्के  पाणी आहे, तर केळगाव प्रकल्प भरला आहे. मात्र, तालुक्यातील अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्प, उंडणगाव, रहिमाबाद प्रकल्पात मृतसाठा आहे. यामुळे येणाऱ्या काळात परतीचा पाऊस झाला नाही, तर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

- ९८५५३.०६ हेक्टर क्षेत्र तालुक्यात लागवडीयोग्य असून, त्यात पेरणी केलेले क्षेत्र ९५ हजार १२८.४० हेक्टर आहे. पडीत क्षेत्र ३ हजार ४२४.६६ हेक्टर आहे.

- सिल्लोड तालुक्याची पैसेवारी - ४४. २१ 

पाच वर्षांतील पाऊस (मि.मी.मध्ये) :
२०१३ - ७२३ 
२०१४ - ७१८ 
२०१५ - ६२६ 
२०१६ - ६०७ 
२०१७ - ७७५ 
२०१८ - ३४१ 

चाराटंचाईची चिंता 
तालुक्यात सध्या २ महिने पुरेल इतका मक्याचा चारा निघू शकतो. मात्र, आगामी काळात भीषण चाराटंचाई निर्माण होऊ शकते. शासनाने तात्काळ चारा छावण्या सुरू करण्याची गरज आहे. तालुक्यात ६ वर्षांपासून दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत.

रबीचा विचार करता येणार नाही 
खरीप हंगाम गेला असून, पाणी कमी असल्याने यावर्षी फळबागा घेता येणार नाहीत. जमिनीत ओल नसल्याने आता रबीचा विचार न केलेला बरा.  
- दीपक गवळी, तालुका कृषी अधिकारी 

बळीराजा काय म्हणतो?
- यंदाही दुष्काळाने कंबरडे मोडले आहे. मी दहा बॅग कपाशीची दुबार पेरणी केली, पण ३ क्विंटल कापूसही निघणार नाही. दुबार पेरणी खर्च, बी -बियाणे खर्च कोठून काढावा, कर्ज कसे फेडावे, मुला मुलींचे लग्न, शिक्षण कसे करावे याची चिंता आहे. - माणिकराव वामनराव पांढरे 

- या वर्षासारखा भयानक दुष्काळ मी या अगोदर कधीच बघितला नाही.  आता शेती करण्याची हिंमत राहिली नाही.  -नारायण पवार 

- माझ्याकडे १५ एकर शेती असून मी यावर्षी पूर्ण पंधरा एकरमध्ये मका लागवड केली. परंतु पावसाने दगा दिल्याने त्या पंधरा एकर मका पिकात मला जनावरे सोडावी लागली. आता ती जमीन पडीत आहे. आमच्या कुटुंबातील ३६ सदस्यांची भिस्त या शेतीवर असून मुलांचे शिक्षण, लग्न कसे करावे, कर्ज कसे फेडावे, याची चिंता आहे. - संजय बंडू बांबर्डे

- मी तीन वर्षांपासून स्वत:ची २८ एकर शेती ठोक्याने व ४३ एकर जमीन स्वत: कसत आहे. परंतु ३ वर्षांपासून पावसाअभावी शेती व्यवसाय तोट्यात आला आहे. यावर्षी तिबार पेरणी करुन चार लाखावर शेतीवर खर्च केला. परंतु चाळीस हजाराचेही उत्पन्न निघणार नाही. यामुळे भविष्यात मी शेती करणेच सोडून देणार आहे. माझ्याकडे कायम चार ते पाच जणांना नेहमी रोजगार उपलब्ध असायचा, परंतु आज मला व माझ्या कुटुंबासाठीच रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. - कृष्णा मावंजी पांढरे

- माझ्याकडे मागील २५ वर्षांपासून ४० जनावरांचा कळप होता. सलग ६ वर्षांपासून दुष्काळामुळे शेतीच पिकली नाही. आता जनावरांसाठी चारा आणायचा कोठून असा  गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे मी किमती दहा जनावरे कवडीमोल भावाने विक्री केली आहे. शासनाने चारा छावण्या सुरू केल्या तर उर्वरित जनावरे जगतील. -नामदेव येडूबा पांढरे 

Web Title: Drought in Marathwada: Third time sowing also get wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.