मराठवाड्यातील दुष्काळ पावसाने धुतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:13 AM2018-08-21T00:13:35+5:302018-08-21T00:13:59+5:30

खरीप पिकांना जीवदान; नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा अधिक जोर

Drought in Marathwada washed by rain | मराठवाड्यातील दुष्काळ पावसाने धुतला

मराठवाड्यातील दुष्काळ पावसाने धुतला

googlenewsNext

औरंगाबाद : पावसाअभावी माना टाकलेल्या खरीप पिकांना वरुणराजाने जीवदान दिले आहे.मराठवाड्याच्या बहुतांश भागात रविवारपासून पावसाने हजेरी लावली असून सोमवारी दिवसभर सर्वत्र कमी-अधिक स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता.
तब्बल २५ दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे़ मुसळधार पावसामुळे नांदेडच्या विष्णूपुरीसह जिल्ह्यातील अनेक प्रकल्प तुडुंब भरले झाले आहेत़ मुदखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे़ भोकर तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे़ हिंगोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरूच आहे. वसमत, डोंगरकडा, कनेरगावनाका, जवळाबाजार, कुरूंदा, कळमनुरी, कडोळी, खुडज, कौठा, सवना, हट्टा, सेनगाव, जवळा पांचाळ, नांदापूर, नर्सीनामदेव, आडगाव रंजे इ. ठिकाणी पाऊस झाला.
जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ मि. मी. पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांत सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली. गेवराई, धारूर, केज, परळी परिसरात रिमझिम पावसाला सुरूवात झाली. लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत दिवसभर भीजपाऊस झाला असून, खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र अद्याप जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जैसे थे असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

नांदेड जिल्ह्यात दोन शेतकरी गेले वाहून
हिमायतनगर (जि़नांदेड) : शेतातून घरी परत येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मारोती संग्राम बिरकुरे (६०, रा.वडगाव जहांगीर) हे नाल्यात वाहून गेले़ गावकऱ्यांनी नदीकाठावर शोधमोहीम सुरु केली होती़ मात्र बिरकुरे यांचा उशिरापर्यंत शोध लागला नाही़ दुसरी घटना हदगाव तालुक्यात घडली. कवाना येथील भारत हरिभाऊ तोडकर (३५) हे शेतकरी शेतातून घरी परत येत होते, तेव्हा पैनगंगा नदीच्या किनाºयावरून जाताना पाय घसरून ते पाण्यात वाहून गेले. उशिरापर्यंत त्यांचाही शोध लाला नव्हता.

परभणी जिल्ह्यातील पाच गावांचा तुटला संपर्क
संततधार पावसामुळे पालम ते जांभूळबेट रस्त्यावरील लेंडी नदीला पूर आला आहे. पाण्याचा ओघ सुरूच असल्याने पुलाच्या पलीकडील बाजूस असलेल्या फळा, आरखेड, सोमेश्वर, घोडा व उमरथडी या गावांचा संपर्क काही तासांसाठी तुटला होता़

पावसामुळे पिकाचे नुकसान; शेतकºयाची आत्महत्या
पुसद (यवतमाळ) : पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे पाहून एका शेतकºयाने सोमवारी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली. डिगांबर काशिराम पवार (५०) रा. कवडीपूर असे मृताचे नाव आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डिगांबर पवार हे रविवारी शेतात गेले असता त्यांना पिकाचे नुकसान झाल्याचे दिसले. त्यांच्या दोन एकर शेतातील कपाशी, ज्वारीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. निराश होऊन त्यांनी सायंकाळी शेतातच विष प्राशन केले. पवार यांच्याकडे स्टेट बँकेचे २० हजारांचे कर्ज असल्याचे समजते.

Web Title: Drought in Marathwada washed by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.