वेरूळ-अजिंठा महोत्सवावर दुष्काळाचे सावट; आयोजनाबाबत विभागीय आयुक्त मंत्र्यांशी चर्चा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:32 PM2018-12-07T13:32:21+5:302018-12-07T13:35:37+5:30
दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील आणि विभागातील दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. पुर्ण जिल्ह्यांतील परिस्थिती भयावर आहे. त्यामुळे महोत्सव घेण्याबाबत मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. असे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
२०१४ ते २०१८ या काळात एक वर्ष हा महोत्सव झाला. गेल्यावर्षीचा महोत्सव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये महोत्सव घेण्याबाबत आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी मध्यंतरी संकेत दिले होते. परंतु औरंगाबादसह मराठवाडा दुष्काळाच्या रेट्याखाली आहे. त्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचे कार्यक्रम आयोजित करावा की न करावा, यावरून प्रशासनाने आता शासनाकडे बोट दाखविले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करूच नये, असे मत काही अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे व्यक्त केले आहे.
वेरुळ-अजिंठा हा सांस्कृतिक महोत्सव १५ जानेवारी २०१८ च्या आसपास होण्याची शक्यता विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी गेल्यावर्षी वर्तविली होती. सीताफळ, रेशीम महोत्सवानंतर त्याबाबत नियोजन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खाजगी संस्थेऐवजी तो महोत्सव एमटीडीसी व विभागीय प्रशासनाच्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु नियोजनासाठी वेळ न मिळाल्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. दुष्काळामुळे महोत्सव होण्याची शक्यता सध्या तरी नाही.
२००१ पासून वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी होणार हा महोतस्व विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात घेण्यास सुरूवात झाली. २००७ पर्यंत हा महोत्सव नियमितपणे झाला. त्यानंतर कोणत्या न कोणत्या कारणामुळे हा महोत्सव आयोजित होऊ शकला नाही. २०११ आणि २०१६ हे दोन वर्ष वगळले तर दहा वर्षांत आठ वेळा सदरील महोत्सव रद्दच करावा लागला.
दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही
आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, जिल्ह्यासह विभागात दुष्काळ आहेच. संबंधित मंत्र्यांशी चर्चा करूनच वेरूळ-अजिंठा महोत्सवाबाबत निर्णय होईल. मागील दोन वर्षांपासून महोत्सव झालेला नाही, ही बाब देखील खरी आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महोत्सव घेणे योग्य वाटत नाही. काही वेगवेगळे मुद्दे आहेत. प्रशासनाला काय वाटते यापेक्षा अडचणी काय आहेत, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे निर्णय शासकीय पातळीवर चर्चा करूनच होईल.
या कारणांनी महोत्सव रद्द झाला
२००८- मुंबई दहशतवादी हल्लयामुळे रद्द
२००९- स्वाईन फ्ल्यूची साथ आल्याने रद्द
२०१०- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे रद्द
२०१३- दुष्काळामुळे महोत्सव रद्द
२०१४- दुष्काळामुळे रद्द
२०१५- दुष्काळी स्थितीमुळे रद्द
२०१७- नियोजन होऊ शकले नाही
२०१८- दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही