नशेखोरांचा रॅकेट तळागाळापर्यंत; २ वर्षांत ३०० पेक्षा अधिक एजंट अटकेत, २ कोटींचा माल जप्त
By सुमित डोळे | Published: February 1, 2024 07:13 PM2024-02-01T19:13:09+5:302024-02-01T19:13:31+5:30
शहरातील नामांकित महाविद्यालय, इंग्रजी शाळांचे विद्यार्थीदेखील महागड्या अंमली पदार्थांना आहारी गेल्याचे तीन कारवायांमधून समोर आले.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला कारणीभूत ठरत असलेली नशेखोरीला आळा घालण्यासाठी पोलिस विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या दोन वर्षांत दोन कोटींपेक्षा अधिक अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, तरीही शहरात अद्यापही नशेखोर व अंमली पदार्थांचा सूळसुळाट सुरूच आहे. जिन्सी, बेगमपुरा, नारेगाव, पडेगाव व वाळूज परिसरातून सर्वाधिक अंमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे वारंवार समोर आले. मात्र, तळागाळापर्यंत गल्ल्यांमध्ये एजंट पसरले असल्याने नशेखोरीवर अद्यापही पोलिसांना परिणामकारक कारवाया शक्य झाल्या नाहीत.
काय आहे एनडीपीएस कायदा?
नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रापिस सब्सटन्स ॲक्ट म्हणजेच एनडीपीएस ॲक्ट १९८५ आणि एनडीपीएस ॲक्ट १९८८ हे दोन कायद्यांतर्गत अंमली पदार्थांबाबत कारवाई होते. यानुसार अंमली पदार्थांची निर्मिती करणे, बाळगणे, खरेदी-विक्री करणे, आयात-निर्यात करणे गुन्हा आहे. केवळ वैद्यकीय आणि शास्त्रीय कारणासाठी अंमली पदार्थांचा वापर करण्यास परवानगी आहे. या प्रकरणात जर आरोप सिद्ध झाले, तर सहा महिन्यांपासून आजीवन कारावासासह एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
वर्षभरात १२५ जणांना अटक
वर्षे....... दाखल गुन्हे...... अटक आरोपी........ गांजा....... नशेच्या गोळ्या.......... नशेच्या बाटल्या
२०२२........ ५८.......... ९९.............. १४९.५९ कि........ १३,७६२.............. ३४५
२०२३........ ८६............... १२५............ १४६.६५ कि........ २,२८८............. ८२४-
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
वर्षे.......... गुन्हे........ आरोपी....... मुद्देमाल
२०२२........... ४.........५.............. ७९,१२,२१५
२०२३.......... ५.............. ५......... २८,२४,३१५
चरस, मॅफेड्रोनचीदेखील विक्री
शहरातील नामांकित महाविद्यालय, इंग्रजी शाळांचे विद्यार्थीदेखील महागड्या अंमली पदार्थांना आहारी गेल्याचे तीन कारवायांमधून समोर आले. एक किलोच्या जवळपास चरस, तर काही कारवायांमध्ये मॅफेड्रोनचाही वापर झाल्याचे निष्पन्न झाले. याचा थेट कनेक्शन नारेगावच्या बलुच गल्लीसोबत निष्पन्न झाला होता.
नशेखोरांवर सातत्याने लक्ष
अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत शहर पोलिस सातत्याने लक्ष असून, कारवाई सुरू आहे. एजंटची साखळी क्लिष्ट आणि मोठी असल्याने तपासात पुढे जाण्यात वेळ लागतो. सर्वाधिक विक्री होणाऱ्या परिसरात आमचे कटाक्षाने लक्ष आहे. तांत्रिक पद्धतीनेदेखील या रॅकेटवर पाळत असून, लवकरच या विरोधात मोठी मोहीम राबविली जाईल.
- धनंजय पाटील, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.