ड्रग्ज रॅकेट चालकांचे लक्ष्य आता विशीतली तरुणाई; छत्रपती संभाजीनगरात एजंट अटकेत
By सुमित डोळे | Published: July 26, 2023 12:26 PM2023-07-26T12:26:35+5:302023-07-26T12:36:05+5:30
अमली पदार्थांचा नारेगावमधील बलूच गल्लीतून मागणीनुसार होतो दलालांना पुरवठा
छत्रपती संभाजीनगर : काही वर्षांपासून शहर अमली पदार्थांच्या गर्तेत सापडले असताना आता अमली पदार्थांच्या ठेकेदारांनी विशीतल्या मुलांना लक्ष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी एका फार्महाऊसवर तरुण-तरुणींच्या पार्टीनंतर सतर्क पालकांनी पोलिसांना ही बाब कळवली. त्यानंतर ड्रग्ज एजंट अनिल अंबादास माळवे (५१, रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. तो दीड ग्रॅम एमडी ड्रग्ज, साडेचार ग्रॅम चरस व साडेतीन किलो गांजा घेऊन विक्रीसाठी आला होता. नशेखोरांमध्ये कुप्रसिध्द असलेल्या नारेगावातील बलूच गल्लीतून या पदार्थांचा पुरवठा होत होता.
शहरातील एका बड्या व्यावसायिकाचा मुलगा मित्रांना भेटायचे सांगून बाहेर गेला होता. परंतु रात्रभर त्याच्याशी त्यांचा संपर्कच झाला नाही. चिंताग्रस्त वडिलांनी बरेच प्रयत्न केल्यावर मुलाशी त्यांचा संपर्क झाला. मात्र मुलगा तर्रर्र नशेत होता. आपल्या मुलाला पहिल्यांदाच अशा अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर त्यांनी त्याच्या संपर्कातील आणखी काही मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. उच्चभ्रू कुटुंबातील मुलांचा यात समावेश होता. त्यानंतर त्यांनी माजी नगरसेवक प्रमाेद राठोड यांच्यासोबत जाऊन हा प्रकार थेट पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांना सांगितला. लोहिया यांनी तत्काळ पुंडलिकनगरच्या निरीक्षक राजश्री आडे यांना गांभीर्याने तपासाचे आदेश दिले.
३२ जणांची चौकशी
आडे यांच्यासह सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक संदीप काळे यांनी जवळपास ७ दिवस ३२ जणांची चौकशी केली. तांत्रिक तपास सुरू ठेवला. त्यात अनिलचे नाव स्पष्ट झाले. त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी साध्या वेशात कर्मचारी तैनात केले. खबऱ्यांमार्फत खरेदीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यातच तो मंगळवारी विश्रामनगरला विक्रीसाठी येणार असल्याचे कळताच दीपक देशमुख, जालिंदर मांटे, ललिता गोरे, संतोष पारधे, संदीप बीडकर, कल्याण निकम, भागीनाथ सांगळे, भीमराव राठोड, योगेश चव्हाण यांनी सापळा रचून अनिलला रंगेहाथ पकडले.
सकाळी साडेसहा वाजता नशा
या मुलांपैकी अनेकजण अभियांत्रिकी, मेडिकलच्या पहिल्या वर्षाला शिकतात. त्यातील काहींची पूल टेबल खेळायला गेल्यानंतर नशेखोरांशी ओळख झाली. त्या माध्यमातून त्यांचा अनिलसोबत संपर्क आला. तेव्हापासून ते त्याच्याकडूनच पदार्थ घेत होते. उच्चभ्रू वसाहतीतील अनेक तरुण, तरुणी अनिलला ओळखतात. अनिलवर १६ गंभीर गुन्हे दाखल असून, त्याचा भाऊ आणि तो मिळून हा धंदा करतात. दोघेही काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आले आहेत. विशेष म्हणजे यातील काही मुले सकाळी साडेसहा वाजता मॉर्निंग वॉकच्या नावाखाली नशेसाठी जात. एकाने तर चक्क आम्हाला कोणी साधे म्हणून चिडवेल म्हणून हे करायला लागलो, असेही सांगितले.
पुन्हा बलूच गल्ली आणि दौलताबाद फार्महाऊस
एनडीपीएस पथकाने काही महिन्यांपूर्वी बलूच गल्लीतील एका लेडी डॉनला अंमली पदार्थ विक्रीत अटक केली होती. गल्लीतील बहुतांश महिला, पुरुष नशेचे पदार्थ विकतात. पोलिस सुद्धा येथे प्रवेश करण्याचे धाडस करीत नाहीत. काही वेळेला येथील महिला पोलिसांवर धावून जातात, गंभीर आरोप करतात. आडे यांनी अनिलच्या चौकशीनंतर तत्काळ बलूच गल्ली गाठली व अनिलला एमडी ड्रग्ज पुरविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, २ जुलै रोजी दौलताबाद परिसरातील एका फार्महाऊसवर झालेल्या पार्टीतदेखील ड्रग्जचा पुरवठा झाला होता. तोही अनिलमार्फतच झाल्याचे सूत्रांनी सांगितले.