दारुड्या पतीचा भररस्त्यात पत्नीवर ॲसिड हल्ला; मदतीला आलेला तरुणही भाजला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 03:00 PM2023-10-23T15:00:49+5:302023-10-23T15:02:05+5:30
फरार आरोपीस नगर जिल्ह्यातून पोलिसानी ताब्यात जेरबंद केले
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत शनिवारी एका महिलेच्या अंगावर तिच्या पतीने ॲसिड फेकले. यावेळी महिलेच्या मदतीसाठी आलेला तरुण प्रेम साबळे हादेखील भाजून जखमी झाला. या घटनेतील आरोपी रमेश गोपीनाथ नीळ (रा.जोगेश्वरी) यास पोलिसांनी रविवारी अहमदनगर जिल्ह्यातून उचलले.
शनिवारी सायंकाळी सुनीता नीळ या कंपनीतून घरी पायी परत येत होत्या. दारूच्या नशेत असलेला त्यांचा पती रमेशने रस्त्यावर आधी त्यांच्याशी वाद घातला. ॲसिडची बाटली घेऊन सुनीता यांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला. सुनीता यांनी प्रसंगावधान राखत पळ काढत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी सुनीता यांच्यासोबत काम करणारे प्रेम अप्पासाहेब साबळे (१८) तसेच दत्ता शिंदे व सुमित हे तिघे मदतीला धावून गेले. सुनीता यांच्या पाठीवर ॲसिड पडून त्या किरकोळ भाजल्या. प्रेमच्या तोंडावर रमेशने ॲसिड फेकल्याने त्याचा चेहरा भाजला. दोन्ही डोळ्यांत ॲसिड गेल्याने तो जखमी झाला. नंतर रमेश पळून गेला. प्रेमने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी प्रेमला शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुनीता यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
बहिरवाडीला लपून बसला...
शनिवारी रात्रीपासून एमआयडीसी वाळूज पोलिस रमेशचा शोध घेत होते. अहमदनगर जिल्ह्यातील बहिरवाडी येथे तो लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक दीपक रोठे, पोकाॅ. यशवंत गोबाडे, सुरेश कचे, सुरेश भिसे, हनुमान ठोके, नितीन इनामे, सूरज अग्रवाल, धीरज काबलिये, देवबोने आदींच्या पथकाने बहिरवाडी येथे बहिणीच्या घरात लपून बसलेल्या रमेशला पकडले.