पाणीटंचाईमुळे माठही कोरडे
By Admin | Published: April 4, 2016 12:30 AM2016-04-04T00:30:03+5:302016-04-04T00:40:19+5:30
अहमदपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्यासाठी घागरभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरु आहे़ सध्या तीव्र उन्हाळा असतानाही यंदा थंड पाणी मिळावे म्हणून
अहमदपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्यासाठी घागरभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरु आहे़ सध्या तीव्र उन्हाळा असतानाही यंदा थंड पाणी मिळावे म्हणून माठ खरेदीकडे सर्वसामान्य धजावत नाहीत़ कारण माठातील पाणी जिरपते आणि यंदा तर पिण्यासाठी विकतचे घ्यावे लागत असल्याने हे परवडेनासे झाले आहे़
उन्हाची चाहूल लागली की, गोरगरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांना मोठी मागणी असते़ माठातील पाणी पिल्यानंतर तहान शमते़ परंतु, यंदा दुष्काळामुळे पिण्यासही पाणी मिळेनासे झाले आहे़ उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे़ त्यामुळे जलस्त्रोत आटत आहेत़ अहमदपूर शहराला तर सध्या जवळपास २५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे नळाला आलेले पाण्याचा काटकसरीने वापर सुरु आहे़
शहरातील सर्व भागांना नळाचे पाणी येत नाही़ त्यातही २५ दिवसांतून एकदा आलेले पाणी पुरेसे ठरत नाही़ त्यामुळे नळाच्या पाण्याचा सुरुवातीचे चार दिवस पिण्यासाठी उपयोग करुन त्यानंतर विकतच्या पाण्यावर तहान भागविली जात आहे़ विकतच्या पाण्यास मागणी वाढल्याने विक्रेत्यांनीही आपले दर वाढविले आहेत़ त्यामुळे एका जारला सध्या जवळपास ३० रुपये मोजावे लागतात़ जारचे पाणी केवळ पिण्यासाठी अत्यंत काटकसरीने वापरले जात आहे़
माठातील पाणी जिरपते़ त्यामुळे जारचे पाणी माठात टाकल्यानंतर कमी होते़ परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना माठातील पाणी पिणे परवडेनासे झाले आहे़ त्यापेक्षा ठराविक रक्कम अनामत ठेऊन नवीन पध्दतीच्या प्लास्टिकच्या जारचे सीलबंद पाणी मिळत आहे़ या प्लास्टिकच्या जारमधील पाणी दिवसातील काही तास थंड रहाते़ त्यामुळे ते सध्या सर्वांना परवडणारे वाटत आहे़ परिणामी, याच जारचा उपयोग केला जात आहे़ त्यामुळे माठांना मागणी कमी झाली आहे़