राज्य हॉकी स्पर्धेत कोल्हापूरला दुहेरी मुकुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:18 AM2017-12-10T01:18:18+5:302017-12-10T01:18:27+5:30
कचनेर येथे आज झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत कोल्हापूरने मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट मिळवला. क्रीडा प्रबोधिनी व नागपूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
औरंगाबाद : कचनेर येथे आज झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत कोल्हापूरने मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट मिळवला. क्रीडा प्रबोधिनी व नागपूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूरने नागपूरचा सडनडेथमध्ये ५-४ गोलने पराभव करीत विजेतेपद पटकावले. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. तिसºया क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पुणे विभागाने औरंगाबादवर ३-0 अशी मात करीत तिसरा क्रमांक मिळवला.
मुलांच्या गटात कोल्हापूर आणि क्रीडा प्रबोधिनी यांच्यातील अंतिम सामना निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत होता. त्यानंतर टायब्रेकरमध्येही दोन्ही संघ ५-५ असे बरोबरीत होते. अखेर सडनडेथमध्य कोल्हापूरने क्रीडा प्रबोधिनीवर ९-८ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यानंतर आॅलिम्पियन अजित लाकरा, हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, अजीज सय्यद, प्राचार्य किरण मास्ट, अशोक चौधरी, के.आर. ठाकरे, गोकुळ तांदळे, उमेश बडवे, श्यामसुंदर भालेराव, संजय तोटावाड यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले. पंच म्हणून नितीन शाह, अरुणसिंग, धीरज चव्हाण, मोहंमद वसीम, अकबर खान, अब्दुल हक, शेख इम्रान, शेख जाहेद, शेख अमान, समीर शेख यांनी काम पाहिले.