दुबईतील नोकरीच्या आमिषाने १९ लाख ८० हजारांचा आॅनलाईन गंडा
By Admin | Published: August 6, 2016 12:16 AM2016-08-06T00:16:35+5:302016-08-06T00:23:38+5:30
औरंगाबाद : शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून त्यांना आॅनलाईन फसविण्याचे प्रकार सुरूच आहेत.
औरंगाबाद : शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून त्यांना आॅनलाईन फसविण्याचे प्रकार सुरूच आहेत. मोठ्या पगाराची नोकरी देण्याच्या आमिषाने एका उच्चशिक्षित महिलेस १५ लाख रुपयांचा आॅनलार्इंन गंडा घालणाऱ्या दोन नायजेरियन भामट्यांना पकडून आणण्यात पोलिसांना यश आले होते. ही घटना ताजी असतानाच दुबईत मोठ्या पगाराची नोकरी आणि अॅडव्हान्स ५० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून शहरातील एकाला १९ लाख ८० हजार ५०५ रुपयांना आॅनलाईन लुबाडण्यात आले. याप्रकरणी जवाहनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आदित्य वळसंगकर (रा.मयूरबन कॉलनी ) यांना २७ एप्रिल रोजी एक मेल प्राप्त झाला. यात दुबईस्थित अमेरिकन हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठीचा तुमचा अर्ज मान्य झाला असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच या मेलमध्ये त्यांना या नोकरीमध्ये ४६ हजार ५०० रुपये दरमहा वेतन आणि ५० लाख रुपये अॅडव्हान्स वेतन म्हणून देण्यात येणार असल्याचे नमूद केले. व्हिसाच्या प्रक्रियेचा खर्च मात्र आदित्य यांना करावा लागेल तसेच नोकरीच्या काळातील
(पान १ वरून)
दुबईत राहण्याचा खर्च कंपनीतर्फे केला जाणार असल्याचे म्हटले होते. या अटी मान्य असतील तर त्यांनी दिलेल्या ई-मेल आणि मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी त्या कंपनीकडे व्हिसासाठी अर्ज केला. त्यावेळी त्यांची आॅनलाईन मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी निवड झाल्याचे त्यांना कळविण्यात आले. १० मे रोजी त्यांना व्हिसासाठी लागणारी फीस म्हणून ९२ हजार ५०५ रुपये भामट्यांनी सांगितलेल्या पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात त्यांनी भरले. त्यानंतर कंपनीने त्यांना ५० लाख रुपये अॅडव्हान्स पगाराचे बिल त्यांना मेलमार्फत पाठवले. ही रक्कम मिळवण्यासाठी दुबईतील अरब बँक येथे खाते उघडण्यास सांगितले. खाते उघडल्यानंतर बँकेत ही रक्कम जमा झाल्याची खात्री झाल्याने ही रक्कम सोडविण्यासाठी आरोपींनी त्यांना वेळोवेळी विविध बँक खात्यांत तब्बल १९ लाख ८० हजार ५०५ रुपये जमा करायला लावले. २८ जून रोजी कंपनीने त्यांना पुन्हा अडीच लाख रुपये जमा करण्याचे सांगितले. आदित्य यांनी रक्कम भरण्यास नकार देताच भामट्यांनी त्यांना जेलमध्ये डांबण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.