‘त्यांचा’ कार्यकाळ संपतोय म्हणून विमानतळ प्राधिकरणाची एनओसी नसतानाही मिनी घाटीच्या उद्घाटनाचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:22 PM2018-06-28T14:22:34+5:302018-06-28T14:23:37+5:30
विमानतळ प्राधिकरणाची एनओसी मिळालेली नसली तरी उद्घाटन उरकण्यात येणार आहे.
औरंगाबाद : चिकलठाणा येथील २०० खाटांच्या मिनी घाटीचे उद्घाटन २ जुलै रोजी करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. विमानतळ प्राधिकरणाची एनओसी मिळालेली नसली तरी उद्घाटन उरकण्यात येणार आहे. कारण ५ जुलै रोजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपत आहे.
विमानतळापासून पाच हजार मीटरपर्यंत रुग्णालय उभारण्यासाठी प्राधिकरणाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावेच लागते. विमानतळापासून अगदी हाकेच्या अंतरावर शासनाने २०० खाटांचे मिनी घाटी उभारली. रुग्णालयात १०० टक्के कर्मचारी भरती झालेली नाही. ७० टक्के अत्याधुनिक यंत्रसामुग्री आली आहे. रुग्णांसाठी फक्त ३० टक्केच औषधी प्राप्त झालेली आहे. उर्वरित औषधी खरेदीची प्रक्रिया सुरू असून, सर्व औषधी येण्यासाठी किमान दोन महिने लागणार आहे. रुग्णालयात उद्घाटनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधाही नाहीत.
आरोग्य विभागाने मागील काही दिवसांपासून मिनी घाटीच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. उपसंचालक, संचालकांमार्फत सर्व माहिती मागविण्यात येत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही उद्घाटनासाठी मिनी घाटी सज्ज असल्याचे नमूद केले आहे. उद्घाटनासाठी संपूर्ण आरोग्य विभागाची यंत्रणा मागील दोन ते तीन दिवसांपासून कामालाही लागली आहे. सोमवार २ जुलै रोजी उद्घाटनाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे.
प्राधिकरणाकडे अर्ज केला
रुग्णालयात विविध आॅपरेशन करावी लागतात. माणसाच्या एखाद्या मांसाचा तुकडा रुग्णालयाबाहेर आला, पक्षी ते खाण्यासाठी गर्दी करतील. त्यामुळे विमानतळाजवळ कोणतेही रुग्णालय सुरू करण्यासाठी प्राधिकरणाची एनओसी आवश्यक असते. आरोग्य विभागाने प्राधिकरणाकडे अर्जही केलेला आहे. मात्र अद्याप एनओसी मिळालेली नाही. प्राधिकरणाने ज्या रुग्णालयांना एनओसी दिली आहे, त्याची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये चिकलठाणा मिनी घाटीचे नावच नाही.
फायर एनओसीही नाही
महापालिकेने मिनी घाटीला फायर एनओसी दिलेली नाही. ओपीडी सुरू करण्याची मुभा दिली आहे. तीन महिन्यांत रुग्णालयात शंभर टक्के अग्निशमन यंत्रणा उभारावी, असेही अग्निशमन विभागाने आरोग्य विभागाला बजावले आहे.