कार बाजूला घेण्यास सांगितल्याने पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण; एका संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 09:43 PM2017-10-14T21:43:59+5:302017-10-14T21:44:33+5:30
रस्त्यात उभी असलेली ओमनी कार बाजूला घेण्यास सांगणाऱ्या वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली.
जालना- रस्त्यात उभी असलेली ओमनी कार बाजूला घेण्यास सांगणाऱ्या वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. मारहाणीत उपनिरीक्षकाचे तीन दात पडले तसंच फ्रॅक्चरही झालं. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, शहर वाहतूक शाखेत कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप भगवान पाटोळे (५४, रा. रामनगर पोलीस कॉलनी) यांची शुक्रवारी साप्ताहिक सुटी होती. दुपारी दीडच्या सुमारास बाजारातून भाजीपाला घेऊन दुचाकीवर घरी जात असताना पोटोळे यांना जैन शाळेच्या मागील बाजूस रस्त्यावर एक ओमनी कार (क्र.एमएच २०, १९५२) उभी असल्याची दिसली. इतर वाहनांना अडथळा होत असल्याने त्यांनी खाली उतरून चालकास कार बाजूला घेण्यास सांगितले. कारमधील संशयित सतीश ताराचंद यादव व संतोष ताराचंद यावद (रा.रामनगर, बालाजी मंदिर) यांनी दिलीप पाटोळे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. अन्य पाच ते सहा जणांनी धावत येऊन पाटोळे यांना काठ्यांनी मारहाण केली. ‘तेरा काम तमाम कर देंगे’ असे म्हणत खिशातील अठराशे रुपये काडून घेऊन पळून गेले.
मारहाणीत पाटोळे यांचे तीन दात पडले. डोक्याला गंभीर इजा झाली. चेहऱ्याचे हाड फ्रॅक्चर झाले. मारहाण करून संशयित ओमनी कारमधून पळून गेले. या प्रकरणी पाटोळे यांनी शुक्रवारी रात्री सतीश ताराचंद यादव, संतोष ताराचंद यादव यांच्यासह चार महिला व अन्य पाच ते सहा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात जिवे माहरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश यादव यास पोलिसांनी शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यास १८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक काकडे तपास करत आहेत.