वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठ्याला शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:46 PM2019-06-10T23:46:46+5:302019-06-10T23:47:30+5:30
औरंगाबाद : मान्सूनपूर्व पावसाने शहराची दाणादाण उडाली असून, वीजपुरवठा करणाऱ्या तारांवर झाडांच्या फांद्या व काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे ...
औरंगाबाद : मान्सूनपूर्व पावसाने शहराची दाणादाण उडाली असून, वीजपुरवठा करणाऱ्या तारांवर झाडांच्या फांद्या व काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे सिडको-हडकोसह शहरातील बहुतांश वसाहतींत पाण्याचा ठणठणाट झाला आहे.
सोमवारी दुपारी एन-५ जलकुंभ परिसरात झाड कोसळल्याने जलवाहिनीला गळती लागली. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला. दोन दिवस जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आठ ते दहा तास उशिराने पाणीपुरवठा झाला, तर चार दिवसांपासून वादळी वारे आणि पावसामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो आहे.
सोमवारी एन-५, एन-७, मरीमाता हर्सूल या जलकुंभांवरून पाणीपुरवठ्यात अडचणी आल्या. एन-५ जलकुंभ परिसरात झाड पडल्यामुळे पाणीपुरवठा बंद करावा लागला.
शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणी वितरणास अडचणी येत आहेत. वीजपुरवठा सुरू होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा मनपाने केला.
महिलांचे जलकुंभ परिसरात आंदोलन
सहा दिवस उलटूनही टँकरने पाणीपुरवठा न झाल्यामुळे जयभवानीनगर गल्ली नंबर १२ मधील महिलांनी सोमवारी दुपारी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेतली.
त्यांनी टँकरचालकाचा शोध घेतला. तो दिसताच त्याला टँकरमध्ये बसविले आणि ते टँकर जयभवानीनगर गल्ली नं. १२ मध्ये घेऊन गेल्या. जयभवानीनगर व परिसरात दोन दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गेल्या आठवड्यात गल्ली नंबर ११ मध्ये एका नऊ वर्षांच्या मुलीचा टँकरखाली येऊन मृत्यू झाला. तेव्हापासून गल्ली नंबर १२ मध्ये टँकरच आले नाही. त्यामुळे सोमवारी दुपारी महिला पाण्याच्या टाकीवर आंदोलनासाठी गेल्या.
एन-५ येथे टँकरचा घोळ सुरूच
एन-५ येथे टँकर भरणा केंद्रावरील घोळ सुरूच आहे. एका वसाहतीचे नाव सांगून टँकर नेले जाते, परंतु ते टँकर दुसरीकडेच रिते केले जाते. चिकलठाणा परिसरातील हिनानगर येथील महिलांनी सोमवारी टँकर न आल्यामुळे एन-५ येथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. महिलांचा रौद्रावतार पाहताच तेथे असलेले टँकर पाठविण्याचा शब्द देण्यात आला. मात्र, टँकर हिनानगरमध्ये गेलेच नाही. त्यामुळे महिलांनी पुन्हा जलकुंभ गाठून कर्मचाºयांना शिवीगाळ केली. त्यानंतर हिनानगरमध्ये टँकर पाठविण्यात आले.