बसची हुलकावणी; वऱ्हाडाचा टेम्पो उलटला
By Admin | Published: April 17, 2016 01:21 AM2016-04-17T01:21:21+5:302016-04-17T01:34:44+5:30
वैजापूर : एसटी महामंडळाच्या भरधाव बसने औरंगाबादकडे जाणाऱ्या वऱ्हाडाच्या टेम्पोला हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो उलटल्याने ३५ वऱ्हाडी जखमी झाले.
वैजापूर : एसटी महामंडळाच्या भरधाव बसने औरंगाबादकडे जाणाऱ्या वऱ्हाडाच्या टेम्पोला हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो उलटल्याने ३५ वऱ्हाडी जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वैजापूर- गंगापूर मार्गावरील महालगाव परिसरात चौदा मैल येथे घडली.
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद आगाराची बस (क्र. एमएच-२० बीटी-२४६०) गंगापूरहून वैजापूरकडे येत होती, तर वऱ्हाडी मंडळींचा टेम्पो औरंगाबाद येथे शिवसेनेच्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जात होता.
महालगावजवळील चौदा मैल परिसरात बसने हुलकावणी दिल्याने टेम्पोचालक भाऊसाहेब नंदू नेहे यांचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो जागेवरच उलटला. या टेम्पोमध्ये ५५ वऱ्हाडी प्रवास करीत होते. त्यामधून ९ जण गंभीर, तर २६ जण जखमी झाले.
गंभीर जखमींमध्ये उमेश विजयनाथ आल्हाट (२०), दादा रुंजा आल्हाट (५०), बाळू कुंडलिक आल्हाट (२६), अमोल ताराचंद बागूल (१६), नीलेश संजय आल्हाट (२६), सागर गोरख आल्हाट (२०), आकाश काशीनाथ गायकवाड (१८), सुनील लक्ष्मण आल्हाट (४४) यांचा समावेश आहे. त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
किरकोळ जखमी झालेल्या विकास भागीनाथ जाधव, वाल्मीक विठ्ठल जाधव, सीताराम दादासाहेब गायकवाड, सिद्धार्थ देवीदास आल्हाट, गौतम भीमराज गायकवाड, सकूबाई काकासाहेब आल्हाट, कैलास कडू बनकर, मारुती तुळशीराम जाधव, नामदेव खंडू गायकवाड, जया काकासाहेब आल्हाट आणि अन्य जखमींवर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच गंगापूरचे एसटी आगारप्रमुख कमलेश भारती, वैजापूरचे आगारप्रमुख राजपूत तसेच वीरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले.