दूषित पाण्यामुळेच ८० टक्के रोग
By Admin | Published: June 18, 2014 01:08 AM2014-06-18T01:08:42+5:302014-06-18T01:25:52+5:30
परभणी: सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते.
परभणी: सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. अशा स्त्रोतामधील पाणी पिल्यामुळे कॉलरा, डायरिया, त्वचारोग, प्लेस्टोस्पायरा असे रोग होण्याचा संभव निर्माण होतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक स्त्रोत दूषित होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. करडखेलकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाच्या वतीने बुधवारी एक दिवसीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा घेण्यात आली. जि. प. कन्या प्रशालेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेस करडखेलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांची प्रमुख उपस्थिती होती.
करडखेलकर म्हणाले, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांना पायबंद घालण्यासाठी पावसाळ्यापूर्वी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्लोरिनचा सुरक्षित साठा, सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे क्लोरिशियन करणे, गटारांची फवारणी, नियमित पाणी तपासणी, ब्लिचिंग पावडरचा वापर करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविकात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहचून ब्लिचिंग पावडरची उपलब्धता करुन देणे गरजेचे आहे. आपण पाण्यामार्फत उद्भवणाऱ्या रोगांची कल्पना नागरिकांना दिली पाहिजे. तसेच वेळोवेळी पाणी तपासणी कीटद्वारे करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ ए. आर. वर्मा, नांदेड जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी व्ही. आर. भेकाने, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ मुशीर हाश्मी यांची भाषणे झाली. कार्यशाळेस गटविकास, विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ, गट, समूह समन्वयक, सल्लागार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)