कोरोनामुळे मंदिरातील टाळ, विणा, मृदंगाचा निनाद पडेना कानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:04 AM2021-06-01T04:04:11+5:302021-06-01T04:04:11+5:30
घाटनांद्रा : गतवर्षीपासून कोरोनाचे संकट देशावर कोसळले आहे. हा संसर्ग ग्रामीण भागासह शहरी भागातही थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर ...
घाटनांद्रा : गतवर्षीपासून कोरोनाचे संकट देशावर कोसळले आहे. हा संसर्ग ग्रामीण भागासह शहरी भागातही थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे धार्मिक, सामाजिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे मंदिरांमध्ये होणारे कीर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताह, हरिपाठ, काकडा भजन बंद असल्याने टाळ, विणा, मृदंगाचा निनाद कानी पडेनासा झाला आहे. यामुळे ही महामारी कधी संपते याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण भागात धार्मिक कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जाते. घाटनांद्र्यासह परिसरातील गावांमध्ये मंदिरात दररोज सकाळ, संध्याकाळ हरिपाठ, काकडा भजन होतात. तसेच वर्षातून दोनदा अखंड हरिनाम सप्ताहाचेही आयोजन केले जाते. अनेक वर्षांपासूनची चालत आलेली ही परंपरा मात्र गतवर्षीपासून कोरोना संकटामुळे थांबली आहे. एकादशीनिमित्त चालणारे भजन, कीर्तन, प्रवचन तसेच सायंकाळी रोज मंदिरांमध्ये होणारा सामुदायिक हरिपाठ हे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे टाळ-मृदंगाचा निनाद लुप्त झाला आहे. घाटनांद्रा येथे विठ्ठल मंदिर ,हनुमान मंदिर, सिद्धिविनायक गणेश या देवतांची मंदिरे आहेत. कोरोना संसर्ग सुरू व्हायच्या आधी या सर्व मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असायची, मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत होते. तसेच घाटनांद्रा, धारला, पेंडगाव, चारणेर आदी परिसरात या दिवसांत सप्ताह होतात मात्र तेही बंद आहेत.