जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने दंत वैद्यकीयच्या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 08:34 PM2019-03-15T20:34:23+5:302019-03-15T20:36:47+5:30
महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची पोलिसांत तक्रार
औरंगाबाद : अनुसूचित जमातीच्या बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय दंत महाविद्यालयात बॅचरल ऑफ डेंटल सर्जन (बीडीएस) अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात गुरुवारी बेगमपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
हर्षल मोतीलाल ठाकूर (२५, रा. न्यू संजीवनी हौसिंग सोसायटी, बजाजनगर) असे गुन्हा नोंद झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, हर्षलने २०११ साली शासकीय दंत महाविद्यालयात बीडीएस अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या राखीव कोट्यातून प्रवेश घेतला होता. प्रवेशावेळी त्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले ठाकूर जातीचे जात प्रमाणपत्र महाविद्यालयास सादर केले होते. अनुसूचित जमातीचे (एस.टी. प्रवर्ग) ठाकूर जातीचे प्रमाणपत्र नंदुरबार येथील सहआयुक्त विभागीय जात पडताळणी समिती यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविल्याचे त्याने महाविद्यालयास सांगितले होते.
मात्र, वेळेत प्रमाणपत्र पडताळणी करून न आल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्याची नोंदणी थांबविली होती. त्याविरोधात हर्षलने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तेव्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयास आधीन राहून त्याचे शिक्षण सुरू ठेवू देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हर्षलचे ठाकूर जातीचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल महाविद्यालयास पाठविला.
या अहवालाच्या आधारे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.पी. डांगे यांच्या आदेशाने डॉ. अमित राधेलाल पराते यांनी हर्षल ठाकूरविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद नोंदविली. पोलिसांनी हर्षलविरोधात गुन्हा नोंदविला असून, पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सरवर शेख तपास करीत आहेत.