महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे ‘फार्म डी’ची मान्यता रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 06:28 PM2019-07-10T18:28:04+5:302019-07-10T18:31:20+5:30
राज्यात केवळ दोन शासकीय महाविद्यालयांतच अभ्यासक्रमाला प्रवेशाची संधी
औरंगाबाद : राज्यातील दोन शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात सुरू असलेला डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म डी) हा अभ्यासक्रम यावर्षी औरंगाबादच्यामहाविद्यालयात रद्द करण्यात आला आहे. आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात ‘एआयसीटी’ आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच ‘पीसीआय’ या सर्वोच्च संस्थांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यास बंदी घातली. यामुळे चालू प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या महाविद्यालयाची एकही जागा दाखविण्यात येत नाही.
औरंगाबाद येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात फार्म डी. हा सहा वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम २०११ पासून शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचीही पसंती आहे. मात्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह तंत्रशिक्षण विभागाने वेळोवेळी या अभ्यासक्रमाची गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. नियोजित वेळेत शिक्षकांची नेमणूक, औषधनिर्माण केंद्राची निर्मिती, फार्मसी प्रॅक्टिस विभाग, आवश्यक त्या सॉफ्टवेअरची खरेदी करण्यात आलेली नाही. याविषयीचा अहवाल केंद्रीय पातळीवरील ‘एआयसीटी’ आणि ‘पीसीआय’ संस्थेकडे पाठविण्यात आला नाही. त्यामुळे ‘पीसीआय’ने २९ एप्रिल २०१९ रोजी पत्र पाठवून आगामी वर्षात प्रवेश करायचे असतील तर संबंधित बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली.
मात्र, त्याकडेही महाविद्यालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ‘एआयसीटी’ची मान्यता मिळाली नाही. याचा परिणाम ‘सीईटी’ सेलमार्फत सुरू असलेल्या आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयाला सहभाग घेता आला नाही. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करताना औरंगाबादच्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयासमोर एकही जागा दाखविण्यात येत नाही. शासकीय महाविद्यालयात कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकत होते. मात्र, महाविद्यालयात प्राचार्य, तंत्रशिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे हा प्रसंग उद्भवला असल्याचा आरोप फार्म डी. संघर्ष समितीचे विद्यार्थी रामप्रसाद नागरे यांनी केला आहे. तसेच २०११ पासून ‘एआयसीटी’, ‘पीसीआय’कडे खोटी माहिती देणाऱ्या तत्कालीन प्राचार्य डॉ. एस. एस. खडबडी, प्राचार्य डॉ. व्ही. के. मौर्य, फार्म डी. समन्वयक डॉ. एस. बी. बोथरा, अधिकारी डॉ. साधना शाही यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांच्याकडे केली आहे.
‘एआयसीटी’, ‘पीसीआय’च्या मान्यता मिळाल्या नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत फार्म डी. अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला नाही. या अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत मिळाल्या तरी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. मात्र विनामान्यता प्रवेश प्रक्रियेत सहभागी करता येणार नाही.
- डॉ. महेश शिवणकर, सहसंचालक