अधिष्ठातांच्या दिरंगाईमुळे पीएच.डी. विभागाच्या कामाचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 08:19 PM2019-04-26T20:19:57+5:302019-04-26T20:22:00+5:30
व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या तक्रारी; दोन दिवसांत घेणार मॅरेथॉन बैठक
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच. डी. विभागात विद्यार्थ्यांची कामे सामाजिकशास्त्रे, विज्ञान आणि आंतरशाखीय विद्याशाखा या दोन विभागाच्या अधिष्ठातांमुळे रखडली असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषद सदस्यांनी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या दालनात अधिष्ठातांच्या समोर केला आहे.
विद्यापीठातील पीएच. डी. विभागात बायोकेमिस्ट्री, मायक्रोबॉयलॉजी, भूगोल, गणित, वृत्तपत्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, संगणक, अभियांत्रिकी आदी विषयांतील विद्यार्थ्यांची बहुतांश कामे प्रलंबित आहेत. यामध्ये प्राध्यापकांना पीएच. डी. गाईडशिप देणे, पीएच.डी.चा अंतिम गोषवारा मंजूर करून पॅनल देणे, पीएच.डी.च्या विषयात किरकोळ बदल करणे, अशा कामांचा समावेश आहे. दिरंगाईमुळे कामाकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी अधिष्ठातांच्या समोरच केला. वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विषयात सर्व प्रकारची कामे पूर्ण झाली आहेत. या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे तात्काळ विद्यार्थ्यांची कामे मार्गी लावतात. तेव्हा उर्वरित अधिष्ठाता विद्यार्थ्यांची अडवणूक का करतात? असा सवालही उपस्थित करण्यात आला.
यावेळी डॉ. सरवदे यांनी अधिष्ठातांची बाजू सांभाळत विद्यार्थ्यांची प्रकरणे तात्काळ मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या प्रश्नांना अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी, डॉ.संजीवनी मुळे यांना उत्तरेही देता आली नाहीत. सदस्य आक्रमक झाल्यामुळे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी हस्तक्षेप करून पीएच.डी. विभागांच्या उपकुलसचिवांना बोलावून घेऊन आगामी दोन दिवसांत प्रलंबित विषय अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत ठेवण्याची सूचना केली. तसेच विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या विभागप्रमुख, अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनाही नियमानुसार पत्र पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गाईडशिप देणे शक्य नसेल, तसे कळवा
भूगोल विषयात काही प्राध्यापक गाईडशिपसाठी पात्र आहेत. मात्र त्या विषयाच्या अभ्यास मंडळाचा अध्यक्ष जाणीवपूर्वक प्राध्यापकांना गाईडशिप मंजूर करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. संबंधित प्राध्यापकांना नियमानुसार गाईडशिप देणे शक्य नसेल, तसे लेखी लिहून द्यावे, अशी मागणी आहे. अन्यथा न्यायालयाचा पर्याय निवडावा लागेल.
- डॉ. फुलचंद सलामपुरे, सदस्य, व्यवस्थापन परिषद
येत्या दोन दिवसांत अधिष्ठाता मंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रलंबित विषय मार्गी लावण्यात येतील. ज्या विषयांचे विभागप्रमुख विद्यार्थ्यांची जाणीवपूर्वक अडवणूक करत आहेत, त्यांच्या ऐवजी इतर तज्ज्ञांना बोलावून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील.
- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू