पोळा सणावर दुष्काळाचे सावट
By Admin | Published: August 24, 2014 11:16 PM2014-08-24T23:16:55+5:302014-08-24T23:52:56+5:30
परभणी: पोळा या सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.
परभणी: शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा सण असलेल्या पोळा या सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. शेतात अन्न-धान्य पिकले नाही आणि पाण्याचीही टंचाई असल्याने हा सण उसणं-अवसान आणून साजरा करण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
यावर्षी जिल्ह्यात पावसाने मोठा ताण दिला. पावसाळ्यातील दोन महिने कोरडेठाक गेले. त्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने रबी हंगाम धुवून गेला. त्यामुळे रबी आणि खरीप या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. अशा संकटकालीन परिस्थितीत पोळा हा सण येऊन ठेपला आहे. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या पशूधनाच्या कष्टातून उतराई होण्यासाठी बैलांची सजावट करुन मनोभावे पूजा केली जाते. परंतु, यावर्षी दुष्काळामुळे हा सण उत्साहात साजरा करणे कठीण जात आहे.
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना पानवठ्यावर नेऊन स्रान घातले जाते. तुप, लोण्याने खांदेमळणी केली जाते. यावर्षी जलसाठे आटले आहेत. पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही तर बैलांच्या स्न्नानाचे काय? असा प्रश्न आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यानुसार शेतकऱ्यांनी रविवारी बैलांची खांदेमळणी करुन घेतली. (प्रतिनिधी)
पोळा सणाच्या निमित्ताने परभणी शहरातील बाजारपेठेत दरवर्षी शेतकऱ्यांची खरेदीसाठी गर्दी होते. परंतु, यावर्षी बाजारपेठेत शेतकऱ्यांची संख्या अल्पशी होती. झुल, कासरे, सुत, घंटा, गोंडे, वेसण, मोरक्या आदी साहित्य पोळ्यापूर्वी विक्रीला येते. परंतु, खरेदीसाठी म्हणावा तसा प्रतिसाद दिसला नाही.
शेतकरी हैराण
ताडकळस- पोळ्याच्या सणावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकऱ्यांत अनुत्साह आहे. दरवर्षी पोळ्याला बैलांसाठी सजावटीचे साहित्य खरेदी केले जाते. परंतु, यावर्षी पाऊस झाला नसल्याने पिके जेमतेम आहेत. सोयाबीन, कापूस जमिनीतच आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे. पोळ्याच्या सणाला मुगाचे पिक शेतकऱ्यांच्या हातात येते. परंतु, यावर्षी कुठलेही धान्य आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला.
येलदरी व परिसरात पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरल्याचे दिसत आहे. सोमवारी पोळा सण असून त्यापूर्वी बैलांना सजावटीसाठी उबलब्ध होणारा साज खरेदीसाठी आठवडी बाजारात गर्दी दिसली नाही. झुल, घागरमाळ, विविध हार, घुंगरे, गोंडे आदींची यानिमित्ताने खरेदी होते. परंतु, यावर्षी या वस्तू खरेदी न करता साध्या पद्धतीने पोळा साजरा होणार असल्याचे दिसते. वाढलेले भाव आणि आर्थिक अडचण लक्षात घेता आठवडी बाजारातून शेतकरी रिकाम्या हातानेच परतल्याचे दिसून आले.
दुष्काळ आणि रोगाचा प्रादुर्भाव
४गतवर्षी लाल्याने व यंदा दुष्काळाने शेतकऱ्यांची वाहताहत केली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली होती. यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे.
४अशा प्रतिकुल परिस्थितीवर बैलांचा पोळा सण कसा करावा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
बैलांना धुण्यासाठीही उरले नाही पाणी...
दैठणा- पावसाळ्यातील अडीच महिने लोटले तरी नदी-नाले कोरडे आहेत. दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पोळ्याला बैल कुठे धुवावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोळा हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण आहे. या सणाच्या दिवशी खरीप हंगामातील मूग, उडीद हे नगदी पीक तयार होऊन घरात येते. त्यामुळे महिनाभरापासूनच पोळ्याची तयारी सुरु असते. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची पूजा करुन आज आवतन् उद्या जेवायला या, असे निमंत्रण दिले जाते. पोळ्याच्या दिवशी सकाळीच उठून बैलांना चारा दिला जातो. जवळच्या नदीला चांगल्या प्रकारे धुवून दुपारी वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. हनुमान मंदिरास प्रदर्शना घालून पूजा करुन गायी-बैलाचे लग्न लावले जाते. एक महिन्यापासून धरलेल्या उपवासाची सांगता होते. परंतु, यावर्षी दुबार पेरणी करुनही शेतात पिकले नाही. पिके सुकू लागली आहेत. बैलांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे.