दुष्काळातही वसुलीचा तगादा
By Admin | Published: January 2, 2015 12:30 AM2015-01-02T00:30:07+5:302015-01-02T00:47:08+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जितराब जगविण्याचे मोठे आव्हाण बळीराजाच्या पुढे उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे.
व्यंकटेश वैष्णव , बीड
दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जितराब जगविण्याचे मोठे आव्हाण बळीराजाच्या पुढे उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. त्याच मायबाप सरकारने आता शेतसाऱ्यासाठी बळीराजाकडे तगादा लावला आहे. शेतसारा भरावयाची रक्कम जरी लहान असली तरी ती भरावीच लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ८ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. मागील तीन वर्षापासूनच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शासनाने बीड जिल्ह्यात १०० दुष्काळ असल्याचे सांगितले. यामध्ये १४०४ पैकी सर्वच गावांतील पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे.
एक एक्कर क्षेत्रातील कापसाला ३० ते ४० किलो कापसाचा उतारा येत आहे. चाऱ्या अभावी शेतकऱ्यांनी जनावरे बाजारात नेहून मातीमोल किमतीत विकले आहेत. एकंदरीत अशी जिल्ह्यातील परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांकडून जमीनींचा शेतसारा भरून घेतला जात असल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले.
एकीकडे शासन दुष्काळी भागासाठी विविध योजना राबवित आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना साधा शेतसारा देखील माफ केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
तीन हेक्टर क्षेत्रासाठी ५००
ज्या शेतकऱ्याचे तीन हेक्टर क्षेत्र असेल त्या शेतकऱ्याला पाचशे रूपयांपर्यंतची रक्कम संबंधीत तलाठी कार्यालयांकडे भरावी लागत असल्योच शिरूर कासार तालुक्यातील शेतकरी नामदेव सानप यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष
जिल्ह्यातील १४०४ गावांमधील पिकांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे़ यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक टंचाईत सापडला आहे़ जिल्हा प्रशासनाने दुष्काळाचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे़ शेतकऱ्यांसाठी नेमकी मदतीची रक्कम किती असेल ? हे आताच सांगणे शक्य नाही़ मात्र, १५ दिवसात मदत येण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले़
शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या शेतसारा वसूलीमध्ये जि. प. च्या वतीने करण्यात आलेल्या वसूलीची रक्कम ३८ लाख ३६ हजार रूपये आहे तर ग्रा. प. स्तरावर घेण्यात येणारा उपकर १ लाख ४ हजार रूपये डिसेंबर दरम्यान पर्यंत जमा झालेला असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.