औरंगाबाद जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:33 AM2018-08-06T00:33:58+5:302018-08-06T00:34:51+5:30
वरुणराजाची पुन्हा एकदा अवकृपा झाल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळातून शेतकरी सावरत असतानाच यावर्षी दुष्काळाचे संकट दारावर येऊन उभे ठाकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके करपून जात असून, त्यांची होणारी वाढही खुंटल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणींत मोठी वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वरुणराजाची पुन्हा एकदा अवकृपा झाल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळातून शेतकरी सावरत असतानाच यावर्षी दुष्काळाचे संकट दारावर येऊन उभे ठाकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके करपून जात असून, त्यांची होणारी वाढही खुंटल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणींत मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यात मागील २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. पिकांनी माना टाकल्या असून, पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यांत सरासरी ३२६.३९ मि. मी. एवढा पाऊस अपेक्षित होता; परंतु आजपर्यंत केवळ १७५.३८ मि. मी. एवढा पाऊस पडल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी १ जून ते ३१ आॅक्टोबरदरम्यान सरासरी ६७५.४६ मि. मी. इतक्या पावसाची नोंद होते. यामध्ये ५ आॅगस्टपर्यंत ३२६.३९ मि. मी. इतका पाऊस होतो. यंदा प्रत्यक्षात ५४.०३ टक्के म्हणजे १७५.३८ मि. मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी ५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात २१३.२९ मि. मी. पाऊस झाला होता. यंदा गतवर्षीपेक्षा ३७.९१ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी ५६ मंडळे कोरडे असून, ९ मंडळांमध्ये केवळ काही थेंबांपुरता पाऊस झाला. दोन महिन्यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत अर्धा पाऊस पडणे अपेक्षित होते. पावसाने दगा दिल्याने पिकांची परिस्थिती गंभीर बनत आहे.
जूनपासूनच पावसाचा लहरीपणा दिसून आला. दोन महिन्यांत आठ ते दहा दिवस वगळता मोठा पाऊस झालेला नाही. बहुतांश दिवस कोरडे आणि भुरभुर पावसातच सरले. जिल्ह्यात १६ जुलै रोजी पावसाने अखेरची बºयापैकी हजेरी लावली होती. तेव्हापासून पावसाने जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे. जिल्ह्यात आणखी काही दिवस मोठा पाऊस नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे पावसाविना पिके हातातून जाण्याचे संकट ओढावण्याची भीती आहे.
अर्धा पावसाळा उलटला आहे, तरी शहरातील व शहरालगतचे तलाव कोरडेठाक आहेत. या तलावांचे तळ उघडे पडले असून, त्यातील वाळू चोरट्या मार्गाने उपसली जात आहे. हर्सूल, सावंगी आणि मोमबत्ता तलावात सध्या शून्य टक्के जलसाठा आहे.
आॅगस्ट महिना लागला असून, आजवर जिल्ह्यात १७५ मि. मी. इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील १०७ लहान-मोठ्या लघुप्रकल्पांत समाधानकारक असा जलसाठा निर्माण झालेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा यंदा हिवाळ्यापासून बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
५ आॅगस्टपर्यंत एकूण सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये ३२६ मि. मी. इतक्या पावसाची अपेक्षा होती. परंतु तेवढा पाऊस न झाल्यामुळे दौलताबाद व खुलताबाद परिसराला थोड्या-फार प्रमाणात पाणीपुरवठा करणाºया मोमबत्ता तलावाने पूर्णत: तळ गाठला आहे.
तलावातील वाळू चोरट्या मार्गाने उपसली जात असताना त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष सुरू केले आहे. हर्सूल- सावंगी तलावाचीदेखील हीच अवस्था आहे. दोन्ही तलाव पूर्णत: कोरडेठाक पडले असून, त्यातील वाळू उपसण्याचा धंदा तेजीत सुरू आहे.
जिल्ह्यात आजवर एकूण सरासरीच्या तुलनेत फक्त २५ टक्के पाऊस पडला आहे. त्या पावसातून तलावात पुरेसा जलसाठा निर्माण झाला नाही. सातारा-देवळाई परिसरातील तळे व तलावांना थोडाफार पाणीसाठा आहे. एवढीच काय ती समाधानाची बाब सध्या आहे.