दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:30 AM2017-10-18T00:30:10+5:302017-10-18T00:30:10+5:30
आकाशकंदिल, विविध आकारातील आकर्षक पणत्या, पूजेच्या साहित्याचे तयार कीट, चोपडी पूजनासाठी लागणा-या रोजमेळीच्या वह्या, फराळाचे साहित्य, फटाके खरेदीसाठी मंगळवारी बाजारात गर्दी पाहायला मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दिवाळीमुळे बाजारात चैतन्याचे वातावरण पाहावयास मिळत आहे. दिवाळीेचे खास आकर्षण असलेले आकाशकंदिल, विविध आकारातील आकर्षक पणत्या, पूजेच्या साहित्याचे तयार कीट, चोपडी पूजनासाठी लागणा-या रोजमेळीच्या वह्या, फराळाचे साहित्य, फटाके खरेदीसाठी मंगळवारी बाजारात गर्दी पाहायला मिळाली.
नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर बाजारात आलेले मरगळीचे वातावरण दिवाळीनिमित्त होणा-या खरेदीमुळे काहीसे दूर झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे व्यापारी वर्ग आनंदित आहे. यंदा परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेती पिकांना शेवटच्या टप्प्यात दिलासा मिळाला आहे. तसेच सध्या बाजारात मूग, सोयाबीन, मका विक्रीसाठी येत असल्यामुळे शेतक-यांच्या हातात पैसा खेळत आहे. त्यामुळे बाजारात दिवाळीनिमित्त मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. मंगळवारी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सावरकर चौक व फूल ेमार्केट परिसरात सकाळपासून ग्राहकांनी गर्दी केली होती. बाजारात पूजेसाठी लागणा-या पणत्या-बोळके, लक्ष्मीपूजनासाठी लागणारी केरसुणी, केळीची पाने, महालक्ष्मीची मूर्ती, लाह्या मुरमु-यांचा प्रसाद, चोपडी पूजनासाठी लागणा-या रोजनिशीच्या वह्या, अत्तर खरेदीसाठी महिलांची लगबग दिसून आली. तर काही व्यापारी दर वर्षीप्रमाणे स्वत: बाजारात फिरून चोपडी पूजनासह लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदी करताना पाहावयास मिळाले. जुन्या जालन्यातील गांधी चमन चौक, शनि मंदिर, नूतन वसाहत, बाजार गल्ली भागात असे दृश्य पाहावयास मिळाले. गत काही वर्षांपासून प्रत्येक सणाला गांधी चमन परिसरात अनेक छोटे व्यापारी दुकाने थाटत असल्यामुळे या जुना जालना भागातील नागरिकांना खरेदीची सुविधा झाली आहे.
रेडिमेड कपड्यांना पसंती
कापड दुकानांमध्ये गर्दी पाहावयास मिळत आहे. मुलांच्या फॅन्सी कपडे खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. कॉटन शर्ट, जीन्सबरोबरच दिवाळीचे आकर्षण असलेल्या पारंपरिक पोशाख खरेदीला पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कपडा बाजार, जिंदल मार्केटमधील कापड दुकानांमध्ये मंगळवारी कपडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली.