आवक वाढल्याने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात अर्ध्या टक्क्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 07:53 PM2018-07-17T19:53:47+5:302018-07-17T19:54:13+5:30
जायकवाडी धरणाच्या नाथसागरात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ७७५७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आवक वाढुन १८१०० एवढी झाली.
पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाच्या नाथसागरात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ७७५७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आवक वाढुन १८१०० एवढी झाली, दरम्यान अवघ्या तीन तासात आज धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली आहे.
यंदा जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही धरणात थेंबभर पाण्याची आवक झालेली नव्हती यामुळे धरण प्रशासनासह मराठवाड्यातील जनतेच्या नजरा या पाण्याकडे लागल्या होत्या. दरम्यान आज धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्याने मराठवाडाभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्हातील धरण समूहातून आज विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मध्यरात्री पासून वाढणार असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
धरणात आज सायंकाळी १९.३०% जलसाठा झाला होता. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शनिवार पासून पावसाने सततधार कायम ठेवल्याने गोदावरीस पुर आला. सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता आज मंगळवारी यात दुपटीने वाढ झाल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे यामुळे जायकवाडीत येणारी आवक सतत वाढत आहे.
तीन तासात अर्धा टक्का वाढ
जायकवाडी धरणात आवक सुरू होण्यापूर्वी जलसाठा १८.७९% एवढा होता दरम्यान तीन वाजेस धरणात आवक सुरू झाली व ६ वाजेस जलसाठा १९.३०% एवढा झाला होता. धरणात ११.०७१ दलघमी एवढी वाढ नोंदविली गेली. आजरोजी धरणात एकूण जलसाठा ११५७.२४० दलघमी तर उपयुक्त जलसाठा ४१९.१३४ एवढा झाला आहे असे धरण अभियंता बुध्दभूषण दाभाडे, रमेश चक्रे व श्याम शेळके यांनी सांगितले.