औद्योगिक उत्पादन घटल्याने मालवाहतुकीची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 07:42 PM2019-07-12T19:42:31+5:302019-07-12T19:44:07+5:30

आठ-आठ दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रात दीड ते दोन हजार मालट्रक उभ्या

Due to industrial slowdown, cargo speed slowed down | औद्योगिक उत्पादन घटल्याने मालवाहतुकीची गती मंदावली

औद्योगिक उत्पादन घटल्याने मालवाहतुकीची गती मंदावली

googlenewsNext
ठळक मुद्दे देशभरातून मागणी कमी झाली आहे. उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे.

औरंगाबाद : मागील महिनाभरापासून उठाव घटल्याने औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन कमी करण्यात आले आहे. परिणामी, मागील आठ दिवसांपासून दीड ते दोन हजारांपेक्षा अधिक मालट्रक जागीच उभ्या आहेत. 

शहरातील  रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा, चितेपिंपळगाव औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे मिळून ४ हजार युनिट आहेत. आॅटोमोबाईल हब म्हणून औरंगाबादची ओळख संपूर्ण जगात आहे. येथून संपूर्ण देशात वाहने, स्पेअर्स पार्ट, जॉबवर्क पाठविले जातात तसेच निर्यातही केली जाते. मात्र, मागील महिनाभरापासून मागणी घटल्याने येथील उद्योजकांनी उत्पादन कमी केले आहे. मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी यांनी सांगितले की, आॅटोमोबाईल सेक्टर, कंज्युमर प्रॉडक्ट, इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्रातील उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे. कारण, देशभरातून मागणी कमी झाली आहे.

बाजारात पैसा खेळता नसल्याचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर होत आहे. मसिआचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक अर्जुन गायके यांनी सांगितले की, आॅटोमोबाईल क्षेत्रातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कारण, आजघडीला देशभरातील शोरूममध्ये साडेतीन कोटी कार व ४० हजार कोटी दुचाकी विक्रीविना शिल्लक आहेत. आॅटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या उत्पादनात घट केल्याने त्याचा येथील वेंडरच्या जॉबवर्कवरही परिणाम झाला आहे. त्याची तीव्रता औद्योगिक क्षेत्रात पाहण्यास मिळते आहे. मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले की, मागील ८ दिवसांपासून मालट्रक वाहतुकीची गती मंदावली आहे. आजघडीला वाळूज, चिकलठाणा एमआयडीसी, शेंद्रा, बीड बायपास इत्यादी ठिकाणी दीड ते दोन हजारांपेक्षा अधिक मालट्रक उभ्या आहेत. 

शहरातून देशभरात उत्पादने पाठविली जातात. त्यात उत्तर व दक्षिण भारतात सर्वाधिक माल पाठविण्यात येतो. मागणी नसल्याने डिझेलचे भाव वाढूनही मालट्रकची भाडेवाढ झाली नाही, अशी परिस्थिती औरंगाबादेतच नाही देशभरात आहे. दरवर्षी जून-जुलै महिन्यात मागणी घटते, पण यंदा याची तीव्रता अधिक जाणवत आहे. 

१० ते १५ टक्के परिणाम 
मार्चअखेर नंतर सर्व प्रकारची मागणी कमी होत असते. जून महिन्यात पाऊस लांबल्याने परिस्थिती थोडी बिकट झाली आहे. विशेषत: चारचाकी वाहनांच्या मागणीवर परिणाम जास्त जाणवत आहे. तरीपण एकंदरीत औद्योगिक उत्पादनावर १० ते १५ टक्के परिणाम झाला आहे. सर्वत्र पाऊस चांगला झाला आहे. यामुळे येत्या काळात मागणी वाढेल. 
- शिवप्रसाद जाजू, सचिव,सीएमआयए

 

Web Title: Due to industrial slowdown, cargo speed slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.