राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते नसल्याने वैजापुरात ९७ लाभार्थी आवास योजनेच्या निधीपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 08:10 PM2017-12-16T20:10:25+5:302017-12-16T20:10:43+5:30
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पंचायत समितीने ९७ लाभार्थींची ऑनलाईन नोंदणी करुन निधी हस्तांतरण आदेश दिले आहेत. पण या लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते नसल्याने अजुनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. एक वर्ष उलटुनही लाभार्थ्यांना राज्य व्यवस्थापन कक्षेतुन घराच्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही.
- मोबीन खान
वैजापुर (औरंगाबाद ) : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पंचायत समितीने ९७ लाभार्थींची ऑनलाईन नोंदणी करुन निधी हस्तांतरण आदेश दिले आहेत. पण या लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते नसल्याने अजुनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. एक वर्ष उलटुनही लाभार्थ्यांना राज्य व्यवस्थापन कक्षेतुन घराच्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही.
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण व शहरी भागात २०१६-२०१७ या आर्थिक वर्षांपासून सुरु असून २०१८-२०१९ या तीन वर्षात, मोठ्या प्रमाणात घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.या घरकुलात एक स्वयंपाकघर याव्यतिरिक्त, घरात शौचालयाचे बांधकामास १२ हजार इतकी जास्तीची मदत देण्यात येणार आहे.या घरकुलांच्या बांधकामांकरीता पूर्वीची आर्थिक मदत ७० हजार ने वाढवून ती आता १ लाख २० हजार इतकी करण्यात आलेली आहे.आवास योजनेसाठी एसईसीसी च्या २०११ च्या डाटामधून ग्रामसभेद्वारे वैजापुर तालुक्यातील २५०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या योजनेमार्फत देण्यात येणारी रक्कम ही आवाससॉफ्ट व पीएफएमएस या संचेतनांचे माध्यमातून या योजनेच्या लाभार्थींचे बँक खात्यात सरळ देय जमा करण्यात येते.मात्र,तालुक्यातील ९७ पेक्षा अधिक लाभार्थीचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते नसल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही.
अर्ज करतांना या लाभार्थिनी ग्रामीण बॅंक खात्यातील खाते नंबर दिले होते.त्यामुळे अशा लाभार्थिच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही.या लाभार्थिना अता राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते उघडून पासबुक झेरॉक्सची प्रत पंचायत समितिति जमा करण्याचे सांगितले आहे, असे गटविकास अधिकारी पुष्पा पंजाबी यांनी सांगितले.