चालकाअभावी उपकेंद्राची बसही धूळ खात

By Admin | Published: August 27, 2015 12:10 AM2015-08-27T00:10:15+5:302015-08-27T00:23:23+5:30

हणमंत गायकवाड , लातूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राला चांगला केअर टेकर मिळाला नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून

Due to lack of driver, sub-center bus also eats dust | चालकाअभावी उपकेंद्राची बसही धूळ खात

चालकाअभावी उपकेंद्राची बसही धूळ खात

googlenewsNext



हणमंत गायकवाड , लातूर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राला चांगला केअर टेकर मिळाला नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबरोबर अनेक सुविधांचाही अभाव आहे़ गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला चालकच नाही़ त्यामुळे ही बस उपकेंद्राच्या परिसरात शोभेच्या वस्तुगत पार्किंग केलेली आहे़ शिवाय, मुला-मुलींच्या वसतिगृहाचा प्रस्तावही शासनाकडे प्रलंबित आहे़
लातूर शहरापासून विद्यापीठ उपकेंद्राचे अंतर १० ते १२ किलोमिटर आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना लातूर शहरातून उपकेंद्रात जाण्यासाठी विद्यापीठाने एक बस दिली आहे़ काही दिवस या बसमधूनच विद्यार्थी उपकेंद्रात जात होते़ मात्र गेल्या एप्रिल महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या बसला चालकच नाही़ त्यामुळे ही बस उपकेंद्राच्या कॅम्पसमध्ये पार्किंग केलेली आहे़ लातूर बसस्थानक, गांधी चौक, रेणापूर नाका, पाण्याची टाकी, शिवाजी चौक व राजीव गांधी चौकात या बसचा थांबा होता़ या थांब्यावरुन विद्यार्थी घेतल्यानंतर बस उपकेंद्रात जात असे़ परंतू आता या बसला चालकच नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाद्वारे उपकेंद्रात जावे लागत आहे़ साध्या चालकाचा प्रश्न विद्यापीठाने गांभिर्याने घेतला नाही़ परिणामी विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे़ सध्या उपकेंद्राच्या तीन संकुलात एमबीएच्या प्रथम वर्गात ३० व द्वितीय वर्षात २०, एम़ए़अर्थशास्त्राच्या प्रथम वर्षात २३ व द्वितीय वर्षात १३, एम़ए़ समाजशास्त्राच्या प्रथम व द्वितीय वर्षाला प्रत्येकी ८, एम़एस्सी़ कॉम्प्युटर सायन्स प्रथम वर्षात २५ व द्वितीय वर्षात १४, एम़एस्सी़बायो़ प्रथम वर्षात १ व द्वितीय वर्षात २, समाजकार्य प्रथम ३६ व द्वितीय २६ असे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ प्रथम वर्षाचा आकडा अधिक असून, द्वितीय वर्षाचा आकडा प्रत्येक अभ्यासक्रमाला कमी झाला आहे़ केवळ उपकेंद्रामध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संस्थेतून काढता पाय घेतला आहे़
लातूर शहराची ओळख शिक्षणाची पंढरी म्हणून देशात झाली आहे़ त्यामुळेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरला उपकेंद्र दिले़ लातूर ते नांदेडचे अंतर दीडशे किलोमिटरच्या जवळपास आहे़ वेळ व पैसा तसेच एवढे अंतर काठून किरकोळ कामासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाण्याची गरज पडू नये म्हणून उपकेंद्राची निर्मिती त्यांनी केली़ परंतू हा उद्देश प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सफल होताना दिसत नाही़ बसला साधा चालक मिळू नये हे उपकेंद्राचे मोठे दुर्दैव आहे़

Web Title: Due to lack of driver, sub-center bus also eats dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.