निधीअभावी ९ पाणीपुरवठा योजना बंद
By Admin | Published: November 25, 2014 12:27 AM2014-11-25T00:27:44+5:302014-11-25T00:58:54+5:30
संजय कुलकर्णी , जालना ग्रामीण भागात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ९ कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना बंद असून तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
संजय कुलकर्णी , जालना
ग्रामीण भागात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ९ कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना बंद असून तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेष म्हणजे केवळ निधीअभावी या योजना बंद असून त्यासाठी टँकरवर खर्च सुरू आहे.
सध्या ग्रामीण भागात दुष्काळाची स्थिती असून काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठ््याची सोय व्हावी, म्हणून जिल्ह्यात आतापर्यंत १०२८ नळयोजनांची कामे झालेली आहेत.
परंतु त्यापैकी ९ योजना केवळ निधीअभावी अनेक दिवसांपासून बंद आहे. जमिनीतील पाणीपातळी कमी झाल्यास टँकरच्या पाण्यावरच या ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.
या नऊ गावांमध्ये भोकरदन तालुक्यातील आन्वा, गोषेगाव, पळसखेडा मूर्तड, अंबड तालुक्यातील रेणापुरी, कर्जत, मंठा तालुक्यातील माहोरा व परतूर तालुक्यातील बामणी, कावजवळा, वलखेडा या गावांचा समावेश आहे. त्यापैकी आन्वा, गोषेगाव, पळसखेडा मूर्तड, रेणापुरी, कर्जत आणि कावजवळा येथील योजना देखभाल दुरूस्तीअभावी बंद आहे. तर पुरेशा पाण्याचा उदभव नसल्याने माहोरा, बामणी व वलखेडा येथील योजना बंद आहेत.या योजनांच्या दुरूस्तीसाठी सरासरी ५४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. परंतु अद्याप निधी न मिळाल्याने सदरील योजना सुरू झालेल्या नाहीत.४
जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम १०२८ नळयोजनांची कामे झालेली आहेत. त्यातील १०१९ योजना सुरू आहेत. परंतु २६२ गावे व वाड्यांमध्ये अद्याप नळयोजनांची कामे झालेली नाहीत. आगामी काळात ही कामे हाती घेण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.
४यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे यांना विचारणा केली असता सदरील नऊ योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार यांच्याकडे त्यासाठी ५४ लाखांच्या निधीची मागणी करण्यात आल्याचेही तांगडे यांनी सांगितले.