निधीअभावी पोलिसांना अल्पोपहार भत्ता, रिवॉर्डची रक्कम मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:05 AM2021-02-27T04:05:26+5:302021-02-27T04:05:26+5:30
याविषयी प्राप्त माहिती अशी की, औरंगाबाद शहर पोलीस दलामध्ये सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. जनतेच्या जीविताचे आणि चल-अचल ...
याविषयी प्राप्त माहिती अशी की, औरंगाबाद शहर पोलीस दलामध्ये सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. जनतेच्या जीविताचे आणि चल-अचल मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रं-दिवस काम करतात. चोरट्यांना पकडण्यापासून ते व्हीआयपी व्यक्तीच्या दौऱ्याचा बंदोबस्त त्यांना करावा लागतो. विशेषत: औरंगाबाद शहर पोलिसांवर व्हीआयपी बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण आहे. याशिवाय सभा, संमेलन आणि विविध राजकीय आणि सामाजिक आंदोलनस्थळीही पोलीस हजर असतात. अशा पोलिसांना शासनाकडून वेतनाशिवाय अल्पोपहार भत्ता मिळतो. दरमहा हा भत्ता त्यांना दिला जातो. कोरोना संकटामुळे राज्य सरकारकडून पोलिसांच्या अल्पोपहार भत्त्यासाठी दिला जाणारा निधी रोखून ठेवण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हा निधीच न दिल्याने पोलिसांना अल्पोपहार भत्ता मिळाला नाही. निधी आल्यावर हा भत्ता दिला जाईल ,असे सूत्राने सांगितले.
चौकट
रिवॉर्डची नुसती घोषणा; हातात मात्र खडकू
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांना पोलीस आयुक्त, उपायुक्तांच्याकडून रिवॉर्ड (बक्षीस) म्हणून रोख रक्कम देण्याचा इंग्रजकालीन पद्धत आहे. ही पद्धत आजही पोलीस दलात राबविण्यात येते. यानुसार गुन्हेगारांना पकडणे अथवा एखाद्या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या पोलीस पथकाला रिवॉर्ड घोषित करतात. हा रिवॉर्ड ५० रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत असतो. या रिवॉर्डची नोंद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत केली जाते. मात्र, आयुक्तालयातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेला नोंद करण्याच्या फायली वरिष्ठांच्या स्वाक्षरीअभावी तशाच पडून असल्याचे सूत्राने सांगितले. रिवॉर्ड देण्यासाठी निधी नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. रिवॉर्डची रक्कम मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.