उशिरा दाखल केल्याने बाळाचा गर्भातच मृत्यू
By Admin | Published: July 16, 2017 12:17 AM2017-07-16T00:17:43+5:302017-07-16T00:18:09+5:30
बीड : पोटात कळा सुरू झाल्याने मातेला गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पोटात कळा सुरू झाल्याने मातेला गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी केवळ एकदाच तपासणी केली. त्यानंतर प्रसुतीची वाट पाहून तब्बल १२ तासांनी जिल्हा रूग्णालयात ‘रेफर’ केले. दरम्यानच्या काळात मातेसह बाळाची प्रकृती गंभीर बनली. येथे आल्यानंतर डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. यामध्ये त्यांना केवळ मातेला वाचविण्यात यश आले, बाळाचा मात्र दुर्दैवाने गर्भातच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी बीड जिल्हा रूग्णालयात घडली.
रीना सुनील दळवी [२४ रा.पुणे ह.मु.गढी (माहेरी आली होती)] यांना शुक्रवारी सायंकाळी कळा येऊ लागल्या. तात्काळ गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. प्रसुतीसाठी वेळ लागेल, उपचार सुरू आहेत, असे सांगून डॉक्टर निघून गेले. परंतु रीना यांच्या कळा थांबत नव्हत्या. नातेवाईकांनी पुन्हा डॉक्टरांकडे धाव घेतली. परंतु डॉक्टर हजर नव्हते. त्यामुळे परिचारिकांना सांगितले. त्यांनी रीनाला तपासण्याची गरज नाही, असे सांगून दुर्लक्ष केले. येथील एका परिचारिकेने प्रसूती सकाळी सहा वाजता होईल, असे सांगितल्याने वाट पाहिली. परंतु रीना यांची प्रसुती होण्याऐवजी प्रकृती गंभीर बनत होती. पुन्हा विचारणा केली असता डॉक्टरांनी तुम्ही बाहेर जा, असे सांगितल्याचे रीनाचे वडील गायकवाड म्हणाले.
सकाळी आठ वाजता डॉ.रौफ यांची ड्यूटी संपल्यानंतर ते निघून गेले. त्यानंतर आलेल्या डॉक्टरांना रीनाच्या प्रकृतीची माहिती देत तपासणीची मागणी नातेवाईकांनी केली. यावेळी त्यांनी रीना यांचे सिझर करावे लागेल. आपल्याकडे सुविधा नाही, असे सांगून जिल्हा रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. रूग्णवाहिकेतून रीनाला सकाळी ११ वा.च्या सुमारास जिल्हा रूग्णालयात आणले. येथे डॉ. केकान यांच्यासह परिचारिकांनी तपासणी करून सिझर केले. यामध्ये बाळ गर्भातच दगावले, तर माता बचावली.