स्थानिकांच्या त्रासामुळे तमाशा मंडळ जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:10 PM2018-12-11T23:10:20+5:302018-12-11T23:10:33+5:30
आधुनिक युगात यात्रा, उरुस आदींच्या माध्यमातून लोककला जिवंत ठेवणे आव्हान असतानाच स्थानिकांच्या त्रासामुळे शेकटा येथून परत जाण्याचा इशारा पुणे येथील कुंदा पाटील पुणेकर यांनी मंगळवारी दिला.
करमाड : लोककलेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकलेली आहे. आधुनिक युगात यात्रा, उरुस आदींच्या माध्यमातून लोककला जिवंत ठेवणे आव्हान असतानाच स्थानिकांच्या त्रासामुळे शेकटा येथून परत जाण्याचा इशारा पुणे येथील कुंदा पाटील पुणेकर यांनी मंगळवारी दिला.
शेकटा येथे दहा दिवसांपासून अब्दुल्ला मियाचा उरुस भरलेला आहे. उरुस १५ दिवस चालत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून भाविक येत आहेत. या ठिकाणी राज्यातील नामवंत लोकनाट्य तमाशा मंडळ अनेक वर्षांपासून हजेरी लावत आहेत. ग्रामीण भागातील लोक तमाशा पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत येतात. त्यामुळे या उरुसमध्ये रात्री लोकांची अधिक उपस्थिती असते. पुणे येथील कुंदा पाटील लोकनाट्य तमाशा मंडळानेही येथे तमाशाचा फड टाकला आहे.
भावना व्यक्त करताना कुंदा पाटील म्हणाल्या की, माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात लोककला जिवंत ठेवणे आव्हान बनले आहे. त्यातच मोबाईल, टीव्ही व सिनेमामुळे तमाशा मंडळ डबघाईस आले आहेत. त्यातच कलाकारांचे मानधन, त्यांचा भोजनाचा खर्च, वाहतुकीचा खर्च यातच आमचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता शेकटा येथेही पोलीस, ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीकडून त्रास दिला जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. पोलीस, ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने एका तमाशासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण होणे अशक्य असल्याने येथून निघून जाण्याचा इशारा त्यांनी दिला.