शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 12:03 PM2021-10-05T12:03:31+5:302021-10-05T12:12:31+5:30
देसी जुगाडकरून स्वत:ची गिरणी, स्वत:ची हळद, दळून देतो डोळ्यासमोर
औरंगाबाद : बाजारात कृषी माल विकताना होणाऱ्या सततच्या तोट्यामुळे कंटाळलेल्या वाशिमच्या शेतकऱ्याने ( Farmer ) मोठ्या हिकमतीने त्यावर उपाय शोधला आहे. या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात पिकवलेली हळद, स्वत:च्या फिरत्या गिरणीवरून ग्राहकांच्या घरोघरी जाऊन दळून देण्याचा कृषी प्रक्रिया उद्योग (Agriculture Processing Unit ) सुरू केला आहे. गेल्या महिनाभरापासून हा शेतकरीऔरंगाबादेतील गल्लोगल्ली फिरून ग्राहकांना विनाभेसळ दळलेली हळद विकतो आहे.
शिवाजी दशरथ कुऱ्हे (रा. एकअंबा, जि. वाशिम) असे या धडपड्या शेतकऱ्याचे नाव. सिडको एन-४ परिसरात रस्त्यावर धडधडणारी गिरणी पाहून कुणालाही कुतूहल वाटेल. कुऱ्हे म्हणाले, मला सव्वादोन एकर शेती आहे. मी पत्नी व दोन मुले शेतीत राबतो. हळदीसारखे नगदी पीक घेऊनही हाती काहीच उतरत नसल्याने हा उद्योग केला. चारचाकी गाडी तयार करून त्यावर डिझेल इंजिनने ही चक्की फिरवतो. गल्लोगल्ली जाऊन लोकांना शुद्ध हळद दळून देतो. गेल्या आठ-दहा महिन्यांपासून मी अमरावतीत हळद दळून विकली. आता नफा दिसतोय. केलेल्या कष्टाचे चीज होतेय.
औरंगाबाद मोठे शहर असल्याने महिन्याभरापूर्वी ही गाडी घेऊन येथे आलो. रस्त्यावर उभे राहून हळद दळून देत होतो. डॉ. बाविस्कर यांना हळद दळून दिली. त्यांनी माझी सहज विचारपूस केली. माझे कष्ट पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला रात्रभर थांबण्यास मोफत रूम दिलीय. मी वाशिमहून हळद लक्झरी बसने मागवतोय.
ग्राहकांना स्वस्त व भेसळमुक्त हळद
बाजारात हळद पावडरची किंमत २०० ते २४० रुपये किलो आहे. ती हळद भेसळयुक्त असू शकते. माझ्या गाडीवरून लोक हळद खरेदी करतात. मी त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना दळून देतो. ही हळद शंभर टक्के शुद्ध आहे. शिवाय मी ती केवळ १६० रुपये किलोने विकतो. दिवसभरात ४० ते ५० किलो हळद मी सध्या औरंगाबादेत विकतो.
असे हे देशी जुगाड
चारचाकी फॅब्रिकेटेड गाडीवर जनरेटर बसवून छोटी गिरणी बसविली आहे. ही चारचाकी चक्क दुचाकीला जोडून ओढली जाते. त्याप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी गाडी उभी करून हळद दळली जाते. दुसऱ्या दिवशी स्थळ बदलले जाते.