सदोष बँक खाते क्रमांकामुळे दुष्काळी अनुदान मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:53 PM2019-05-23T23:53:01+5:302019-05-23T23:53:31+5:30
शासनाच्या वतीने दुष्काळी अनुदानाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. मात्र, महसूल विभागाकडून यादी पाठविताना अनेक शेतकऱ्यांचे सदोष बँक खाते क्रमांक पाठविण्यात आले आहेत.
वाळूज महानगर : शासनाच्या वतीने दुष्काळी अनुदानाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. मात्र, महसूल विभागाकडून यादी पाठविताना अनेक शेतकऱ्यांचे सदोष बँक खाते क्रमांक पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेकडून शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यास नकार दिलाजात आहे.परिणामी वाळूज परिसरातील शेकडो शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित आहे.
वाळूज येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दुष्काळी अनुदान मंजुर झालेल्या वाळूज, शेंदूरवादा, नारायणपूर, लांझी, पिंपरखेडा आदी भागातील शेतकºयांची यादी लावली आहे. संबधित सज्जाच्या तलाठ्याने बँकेकडे याद्या पाठविल्यानंतर या यादीतील शेतकरी बँकेत अनुदानाची रक्कम काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र, बँक अधिकाºयांकडून या शेतकºयांना यादीमध्ये तुमचा बँक खाते क्रमांक चुकीचा भरण्यात आल्याने अनुदान मिळणार नसल्याचे सांगत महसूल विभागाकडून नव्याने खाते क्रमांकाची माहिती भरण्यास सांगितली जात आहे.
शेतकºयांना संबधित तलाठ्याकडून सदोष बँक खाते क्रमांक बदलून आणण्याच्या सूचना बँकेच्या अधिकाºयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बँकेचे पासबुक घेऊन यादीत नव्याने खाते क्रमांक समाविष्ट करण्यासाठी लगतच्या तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र कन्नडचे उपविभागीय अधिकारी व त्यांच्या वाहनचालकावर खोटा गुन्हा नोंद केल्याचा आरोप करुन महसूल विभागाचे कर्मचारी आठवडाभरापासून संपावर केले आहेत. या संपामुळे तलाठी कार्यालयात हजर राहत नसल्यामुळे सदोष असलेल्या बँक खात्याची दूरुस्ती करण्यासाठी शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता पावसाळा तोंडावर आला असून, जमिनीच्या आंतर मशागतीची कामे वेगात सुरु आहेत. खरीप हंगामात बि-बियाणे व खत खरेदी करण्यासाठी दुष्काळी अनुदानाचे पैसे कामी येणार असल्यामुळे शेतकरी अनुदानाचे पैसे केव्हा मिळताच याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
३०० शेतकºयांचे बँक खाते क्रमांक चुकले
विशेष म्हणजे तलाठी कार्यालयाकडून दुष्काळी अनुदान मंजुर झालेल्या शेतकºयांची यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाठविण्यात आलेली आहे. या यादीत जवळपास ३०० शेतकºयांचे बँक खाते क्रमांक चुकीचे नमूद केल्यामुळे या शेतकºयांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नाही. या शेतकºयांनी तलाठी कार्यालयातून सदोष नमूद केलेले बँक खाते क्रमांक बदलून आणल्यास त्यांना अनुदान दिले जाणार असल्याचे बँकेचे अधिकारी अनिल रिठे यांनी सांगितले.