गाळ काढणीमुळे मातीचे झाले सोने
By Admin | Published: April 22, 2016 12:30 AM2016-04-22T00:30:24+5:302016-04-22T00:41:37+5:30
हिंगोली : तालुक्यातील भांडेगाव, थोरजवळा, नांदुरा, आडगाव या गावांतील तलावासह हिंगोलीतील गणेशवाडी भागातील तलावातून गाळ गाढण्यास महिनाभरापासून सुरुवात झाली आहे.
हिंगोली : तालुक्यातील भांडेगाव, थोरजवळा, नांदुरा, आडगाव या गावांतील तलावासह हिंगोलीतील गणेशवाडी भागातील तलावातून गाळ गाढण्यास महिनाभरापासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पाचही तलावांतून ४९ हजार ४७५ ब्रास गाळ काढण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे.
तालुक्यातील पाच ठिकाणच्या तलावातून काढण्यात येणाऱ्या तलावातील गाळामुळे १०५ शेतकऱ्यांची जमीन सुपीक झाली असून, तलावाची खोली वाढण्यास मदत झाली आहे. यात आडगाव- भिंगी येथील तलावावर ४ जेसीबी यंत्रांच्या साह्याने २५ टॅक्टरद्वारे २५ शेतकरी काढलेला गाळ आपल्या शेतात नेऊन टाकत आहेत. तर त्या ठिकाणी आजघडीला २० हजार ८७५ ब्रास गाळ काढण्यात आला आहे. तसेच थोरजवळा येथील तलावावर ४ जेसीबीच्या साह्याने २२ ट्रॅक्टरद्वारे २२ शेतकरी आपापल्या शेतात गाळ नेऊन टाकत असल्याने, तळ्यातील १९ हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे. तसेच नांदुरा येथील पाझर तलावातून एका जेसीबीच्या साह्याने ६ शेतकरी आपापल्या शेतात गाळ टाकून घेत असल्याने आजघडीला ३०० ब्रास गाळ काढण्यात आला आहे. भांडेगाव येथील तलावातून दोन जेसीबीच्या साह्याने १० ट्रॅक्टरद्वारे गाळ काढण्यात येत आहे. यात ७ हजार २०० ब्रास गाळ काढण्यात आला आहे. तर गणेशवाडी भागातील चिरागशाह परिसरातील तलावातून दोन जेसीबीच्या साह्याने २० ट्रॅक्टरद्वारे गाळ गाढण्याचे काम सुरु असून, येथील गाळ ३६ शेतकरी घेवून जात आहेत. आतापर्यत १८४ एकरामध्ये गाळ टाकण्यात आल्याची नोंद तहसीलकडे झाली आहे. तहसीलस्तरावर गाळ काढणीचे नियोजन लावण्यात येत असून, आठवड्यानुसार संबंधित ठिकाणच्या तलावातून गाळ काढल्याची नोंद केली जात आहे. संबंधित भागातील शेतकऱ्यांनी तलावातील गाळ उपसून आपल्या शेतात नेऊन टाकून शेतीची सुपीकता वाढवावी, जेणेकरुन येत्या काही वर्षात आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे नायब तहसीलदार सचिन जैस्वाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)