बस न मिळाल्याने ट्रक करून दिवाळीसाठी गावी निघालेल्या नागरिकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 2 ठार 12 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 01:55 PM2017-10-19T13:55:24+5:302017-10-19T13:58:22+5:30
पुण्याहून बुलढाण्याला दिवाळीसाठी टेम्पोने घरी जात असलेल्या नागरिकांचा करमाड जवळ अपघात होऊन 2 जण जागीच ठार झाले आहेत.
औरंगाबाद : पुण्याहून बुलढाण्याला दिवाळीसाठी टेम्पोने घरी जात असलेल्या नागरिकांचा करमाड जवळ अपघात होऊन 2 जण जागीच ठार झाले आहेत. तर ११ जण गंभीर जखमी आहेत. यातील एकाची परिस्थिती अत्य्नात नाजूक आहे.ही घटना आज पहाटे करमाड जवळील गोलटगाव फाट्यावर घडली.
या बाबतअधिक माहिती अशी कि , पुणे परिसरात चाकण येथे बुलढाणा जिल्ह्यातील खळेगाव, सिंदखेडराजा व जवळील गावातील 20 ते 30 नागरिक खाजगी नोकरी करतात. त्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने ते गावी जाण्यास निघाले. पुण्यातील बस स्थानकात आले मात्र, एस टी बस कर्मचा-यांचा संप असल्याने त्यांना बस मिळाली नाही.
यामुळे नाईलाजाने त्यांनी भाड्याचा ट्रक करून घरी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासा दरम्यान सकाळी करमाड गावाजवळ गोलटगाव फाट्याच्या वळणावर चालकांचे ट्रक वरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्यावरील डीवायडरवर धडकली व उलटी झाली. यात समोरच्या कॅबिन मध्ये असलेले चालक पुरुषोत्तम किसन वायाळ (40, रा खळेगाव) प्रवासी प्रकाश भुत्तेकर (30,रा. बुलढाणा) हे दोघेजण जागीच ठार झाले. तर मागे बसलेले 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.ट्रकमध्ये 30 च्या जवळपास प्रवासी होते यामुळे जखमींचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे.
या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले. काहींना घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.