पेठबीडच्या गुन्ह्यांमुळे पोलीस दल बदनाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:36 AM2017-10-28T00:36:43+5:302017-10-28T00:36:46+5:30
पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे येथीेल जनता भयभीत झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे येथीेल जनता भयभीत झाली आहे. तडीपार केलेले आरोपी सर्रास खुलेआम फिरणे, गोळीबार, तसेच या भागात चालत असलेला बनावट नोटांचा कारखाना इ.चा समावेश आहे. केवळ पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत असल्यामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दल बदनाम होत आहे.
पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकावर टिच्चून बनावट नोटा तयार करणा-या कारखान्याचा मध्यप्रदेश पोलिसांनी पर्दाफाश केला. तसेच गतमहिन्यात तरुणावर गोळीबार झाला. याचा अद्यापही तपास लागला नाही. त्यातच तडीपार केलेले आरोपी सर्रास या परिसरात खुलेआम फिरत आहेत. अशा वाढत्या गुन्ह्यांमुळे जिल्हा पोलीस दल बदनाम होत चालले आहे. विशेष म्हणजे केवळ पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ होत असल्याने येथील अधिकारी, कर्मचा-यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एकीकडे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पो.नि. घनश्याम पाळवदे, पो.नि. दिनेश आहेर, सपोनि श्रीकांत उबाळे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे दिवाळीचा सण शांततेत पार पडला; परंतु पेठबीड पोलीस ठाण्यात मात्र गुन्हेगारी थांबली नाही.
पेठबीड पोलीसांच्या निष्क्रियतेमुळे दिवाळीतही येथे गुन्हे होतच राहिले. एका पोलीस ठाण्यामुळेच जिल्हा पोलीस दल बदनाम होत आहे. येथील अधिकारी, कर्मचाºयांची चौकशी करून वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पेठबीड ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव म्हणाले, बनावट नोटांची कारवाई मध्य प्रदेश पोलिसांनी केली आहे. आम्ही त्यांना सहकार्य केले. तसेच गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाळवदे म्हणाले, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आमचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.