पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरांचा कट उधळला
By Admin | Published: June 11, 2014 12:23 AM2014-06-11T00:23:26+5:302014-06-11T00:26:31+5:30
शिरूरकासार : येथे सोमवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे पसार झाले.
शिरूरकासार : येथे सोमवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे पसार झाले.
शिरूर शहरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री शहरात अंधार असल्याचा फायदा घेऊन काही चोरटे शहरात दाखल झाले होते. शहरातील हनुमान मंदिराजवळील सोन्याच्या दुकानाचे शटर चोरटे तोडत होते. यावेळी चोरट्यांना गस्तीवरील पोलीसांचा अंदाज आला. यावेळी शिरूर ठाण्याचे जमादार आदिनाथ तांदळे व कॉन्स्टेबल विधाते यांच्यासह इतर पोलीस गस्तीवर होते. त्यांनी चोरटे शटर तोडत असल्याचे पाहताच त्यांच्याकडे धाव घेतली. पोलीस येत असल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला. यावेळी बऱ्याच अंतरापर्यंत पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र अंधार पाहून चोरटे पसार झाले.
शिरुर शहरात आलेले चोरटे सशस्त्र होते. त्यांनी सोन्या- चांदीच्या दुकानाचे शटर तोडताना धारदार हत्याराचा वापर केला होता. याच वेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी शस्त्र खाली ठेवून पळ काढल्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत यांनी सांगितले. तसेच सदरील चोरट्यांचा तपास करण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. शिरूर शहरासह परिसरात चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी यानंतरही पोलिसांची गस्त सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)